भिवंडी । भिवंडी महापालिका कार्यक्षेत्रांतर्गत राहत असलेल्या रहिवाशांकडे विविध करांपोटी थकीत रकमा आहेत. थकबाकीदारांसाठी अभय योजना राबवूनदेखील प्रतिसाद दिला जात नाही. थकीत कराच्या रकमा न भरल्याने विकासकामे ठप्प झालेली आहेत. थकबाकीदारांना कराच्या रकमा भरण्यासाठी नोटीसदेखील देण्यात आलेल्या आहेत. लिलावाच्या कडक कारवाईअंतर्गत प्रथम 325 मालमत्ता निवडण्यात आल्या असून, तद्नंतर टप्प्याटप्प्याने पुढील लिलाव प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. त्यात प्रभाग समिती क्रमांक-1-35, 2-112, 3-20, 4-60, 5- 98, असे एकूण 5 प्रभाग मिळून 325 मालमत्ताधारक लिलाव प्रक्रियेत मोडत आहेत. मालमत्ताधारकांनी थकीत रकमा महापालिका प्रभागात भरून कारवाई टाळावी, असेे आवाहन आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी केले आहे. दरम्यान, आठ महिन्यांपूर्वी व्याज आणि दंडाची कार्यवाही होऊ नये म्हणून अभय योजना जाहीर करून थकबाकीदारांनी त्याला प्रतिसाद दिला नाही.
करमूल्यांकन विभागाच्या उपायुक्त वंदना गुळवे आणि त्यांचे सहकारी अधिकारी कर्मचारी थकबाकी वसुलीसाठी विशेष प्रयत्न करत आहेत. पण थकबाकीदार रकमा भरण्यासाठी पुढे येत नाहीत. आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांच्या आदेशान्वये आठ महिन्यांपूर्वी व्याज आणि दंडाची कार्यवाही होऊ नये म्हणून अभय योजना जाहीर करून थकबाकीदारांना सवलत देऊ केली, पण कोणताही प्रतिसाद मिळाला नाही म्हणून पुन्हा नव्याने 14 ऑक्टोबर ते 17 नोव्हेंबर 2017 दरम्यान दुसर्यांदा अभय योजना जाहीर करून थकीत रकमा भरण्याचे आवाहन केले, पण त्यालाही प्रतिसाद नाही.
करमूल्यांकन विभागाचा प्रयत्न
लिलावाच्या कडक कारवाईअंतर्गत मालमत्ता सील करणे तसेच बेकायदा इमारती आणि घरातील वीज व पाणीपुरवठा खंडित करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. थकबाकीदार मालमत्ताधारकांपैकी ज्यांनी मालमत्ता कराची अर्धी अधिक रक्कम भरली असेल त्यांना लिलाव प्रक्रियेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न प्रशासन करत असल्याची माहिती करमूल्यांकन विभागातर्फे देण्यात आली.