पिंपरी-चिंचवड : पिंपर-चिंचवड महापालिकेचा 2017-18 या आर्थिक वर्षाचा मूळ 3 हजार 48 कोटींचा आणि जेएनएनयुआरएम व केंद्र शासनाच्या इतर योजनांसह 4 हजार 805 कोटींचा अर्थसंकल्प महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी स्थायी समितीला मंगळवारी (दि. 18) सादर केला. अर्थसंकल्पामध्ये मागासवर्गीय कल्याणकारी योजना, महिला व बालकल्याण योजना तसेच क्रीडा निधीत भरघोस वाढ करण्यात आली आहे. मेट्रो प्रकल्पासाठी 50 कोटी आणि स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी 49 कोटी 50 लाखांची तरतूद; तसेच विकास आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी अर्थसंकल्पात प्रथमच स्वतंत्र 67 कोटींची तरतूद करण्यात आल्याचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सांगितले. आयुक्त दिनेश वाघमारे यांनी 2017-18 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे यांना सादर केला. 1 कोटी 99 लाख रुपये शिलकीच्या या अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ सुचविण्यात आली नाही.
शहर विकास आराखड्याची अमलबजावणी होणार
महापालिका मुख्यालयातील तिसर्या मजल्यावरील दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृहात सकाळी अकरा वाजता स्थायी समितीच्या विशेष सभेमध्ये आयुक्त दिनेश वाघमारे यांनी स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे यांच्याकडे अंदाजपत्रक सादर केले. यावेळी अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे, सहआयुक्त दिलीप गावडे, स्थायी समिती सदस्य आदी उपस्थित होते. अर्थसंकल्पावर अभ्यास करण्यासाठी मंगळवार (दि.25)पर्यंत स्थायी सभा तहकूब करण्यात आली. अर्थसंकल्पाबाबत माहिती देताना आयुक्त वाघमारे म्हणाले, अर्थसंकल्पात स्मार्ट सिटी आणि मेट्रो या दोन मोठ्या प्रकल्पांसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी 49 कोटी 50 लाख आणि मेट्रो प्रकल्पासाठी 50 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तसेच प्रधानमंत्री आवास योजनेसाठी 50 कोटी, स्वच्छ भारत अभियान योजनेसाठी 97 कोटी, आंद्रा-भामा आणि आसखेड या धरणातून शहरासाठी 267 एमएलडी पाणी आणण्यासाठी अंदाजपत्रकात 70 कोटी 50 लाखांची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय, शहर विकास आराखड्याची अंमलबजावणी करण्यासाठी अर्थसंकल्पात यंदा प्रथमच स्वतंत्र तरतूद करण्यात आली आहे. विकास आराखड्यासाठी अंदाजपत्रकात 67 कोटींची तरतूद आहे.
कल्याणकारी योजनांसाठी जादा तरतूद
प्रधानमंत्री आवाज योजनेसाठी 50 कोटी, अमृत योजनेसाठी 36.35 कोटी, स्वच्छ भारत मिशनसाठी 97 कोटी, नगररचना भू-संपादनकरीता 137 कोटी, पीएमपीएमलसाठी 135 कोटी, पाणी पुरवठा विशेष निधी 70.50 कोटी, अपंग कल्याणकारी योजनेसाठी 20.42 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच महिलांच्या विविध कल्याणकारी योजनांसाठी 48.32 कोटी तरतूद केली आहे. मागासवर्गीय योजनांसाठी 53.77 कोटी, अपंग कल्याणकारी योजना 20.42 कोटी आणि क्रीडा निधीसाठी 33.63 कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे. मागासवर्गीय नागरिक, महिला, बालक व अपंगांच्या कल्याणासाठी प्राधान्य देण्यात आले आहे. दरवर्षीचे अर्थसंकल्प तयार करताना एकूण अर्थसंकल्पाच्या 5 टक्के निधी वरील सर्व घटकांसाठी राखीव ठेवणे गरजेचे आहे. यंदाचा अर्थसंकल्प तयार करताना या सर्व घटकांना जादा निधीची तरतूद करून आगामी वर्षात त्यांच्यासाठी कल्याणकारी योजना राबविण्यास प्राधान्य दिले जाणार आहे.
ठळक वैशिष्ट्येे!
* जल:निसारण विभागासाठी 97 कोटी तरतूद
* सामाविष्ट गावात 32.11 किलोमीटर जल:निसारण नलिका टाकणे
* झोपडपट्टीक्षेत्रात 14.27 किलोमीटर नवीन जल:निसारण नलिका टाकणे
* चिंचवडगाव व थेरगावला जोडणार्या पवनानदीवर 28 कोटीचा ’बटर फ्लाय’ ब्रीज
* चिंचवडगाव येथे 50 लाखांचे दुमजली वाहनतळ उभारणार
* भोसरी येथे 12.5 कोटीचे कुस्ती प्रशिक्षण केंद्र करणार
* अजमेरा कॉलनी, थेरगाव आणि आकुर्डी येथे सुसज्ज रुग्णालय उभारणार
* बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालय आणि सखुबाई गवळी उद्यानात रंगीत कारंजे
* मासूळकर कॉलनी व खराळवाडी येथे मोठी उद्याने
* रावेत येथे बास्केट ब्रिजला लागून नवीन बंधारा बांधणार
* चिखली व बोपखेल येथे मैलाशुद्धीकरण केंद्र