पाकिस्तानातील चित्रपटप्रेमी होणार झिंग झिंग झिंगाट!
मुंबई : पाकिस्तानातील पहिल्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये सैराट या मराठी चित्रपटाची निवड झाली आहे. पाकिस्तानची राजधानी कराचीमध्ये 29 मार्च ते 1 एप्रिलदरम्यान होणार्या या फिल्म फेस्टिव्हलमध्ये भारतातून सैराट व बाहुबलीसह एकूण 9 चित्रपट निवडण्यात आले आहेत. यामध्ये सैराट हा एकमेव मराठी चित्रपट आहे. त्यामुळे लवकरच पाकमध्येदेखील सैराटची झिंग पाहायला मिळणार आहे.
बाहुबली, डिअर जिंदगी आदींची निवड
कमाईचे सर्व विक्रम मोडणार्या सैराटची जादू आजही प्रेक्षकांवर कायम आहे. अनेक फिल्म फेस्टिव्हलमध्ये झळकल्यानंतर आता सैराट पाकिस्तानातील प्रेक्षकांना जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे. सैराट बरोबरच दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांचा बाहुबली तसेच डिअर जिंदगी, आखों देखी, हिंदी मीडियम, कडवी हवा, निलबटे सन्नाटा, साँग्स ऑफ स्कॉरपियन्स हे चित्रपटसुद्धा दाखवले जाणार आहेत.
राजामौली यांनी मानले आभार
राजामौली यांनी एक ट्वीट करुन या चित्रपटांच्या निवडीसंदर्भात घोषणा केली. ट्वीटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, बाहुबलीच्या निमित्ताने मला जगभ्रमंतीची संधी मिळाली. त्यातही सर्वांमध्ये पाकिस्तानची भेट विशेष संस्मरणीय असेल. पाकिस्तानच्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलकडून मिळालेल्या निमंत्रणाबद्दल आभारी आहोत.