कराटे स्पर्धेत शिरूरचे विद्यार्थी चमकले!

0

शिक्रापूर । नेरुळ नवी मुंबई येथे महाराष्ट्र पींच्याक सिलंट असोसिएशनच्या वतीने राष्ट्रीयस्तरवरील पींच्याक सिलाट कराटे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या राष्ट्रीयस्तरवरील स्पर्धेमध्ये 28 राज्यातून जवळपास 400 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. त्यामध्ये महाराष्ट्र संघामध्ये शिरूर शहरातून चारजणांची निवड झाली होती. स्पर्धेत महाराष्ट्रातील स्पर्धकांनी इतर राज्यातून सहभागी झालेल्या स्पर्धकांचा पराभव करून घवघवीत यश संपादन केले.

या यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये रयत शिक्षण संस्थेचा तेजस भाईक, विद्याधाम प्रशालेतील दिव्या लक्ष्मण कोळी, संयुक्ता जंगम, प्रज्वल शेळके यांनी महाराष्ट्र संघाकडून खेळताना यश संपादन केले. स्पर्धेप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री शशिकांत शिंदे, आमदार मंदा म्हात्रे तसेच महाराष्ट्र पींच्याक सिलाट कराटे असोसिएशनचे अध्यक्ष सिंग व असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी सिंग यांनी सांगितले की, स्पर्धेचे युवा कल्याण क्रीडा मंत्रालय भारत सरकार यांच्या मान्यतेने आयोजन केले गेले आहे. स्पर्धेतून निवड झालेल्या खेळाडूंची 20 एप्रिल ते 28 एप्रिल दरम्यान थायलंड येथे होणार्‍या वर्ल्ड चॅम्पिअनशिप स्पर्ध्येसाठी निवड होणार आहे. सर्व विद्यार्थ्यांना शिरूर येथील कराटे क्लासचे अकबर शेख सर, दत्तात्रय गव्हाणे, जितेंद्र घोडके, दीपाली कटके या शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.