करिअरची निवड करताना क्षमता ओळखून ध्येय ठरवा

0

नंदुरबार । विद्यार्थ्यांनी करिअरची निवड करतांना स्वतःची क्षमता ओळखून ध्येय ठरविले पाहीजे, असे प्रतिपादन जळगांव येथील दीपस्तंभ फाऊंडेशनचे संचालक यजुर्वेंद्र महाजन यांनी नंदुरबार येथे श्रीराम कोचिंग क्लासेसतर्फे आयोजित एज्युकेशन एक्स्पो 2017 प्रसंगी केले. करिअर कसे निवडावे? स्वतःला कसे ओळखावे? यशस्वी करिअरसाठी कोणती कौशल्य असावीत? अशा अनेकविध प्रश्‍नांची उत्तरे मिळविण्यासाठी श्रीराम क्लासेसतर्फे दोन दिवसीय एज्युकेशन एक्स्पोचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटन सोहळा उद्योजक किशोर वाणी, मुंबई येथील आशा फाऊंडेशनचे संचालक गिरीष कुलकर्णी, आशिष वाणी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

वयोगटाचा विचार करुनच अपेक्षा कराव्यात
महाजन म्हणाले की, पालकांनी विद्यार्थ्यांच्या आवडी-निवडी, कल वयोगटाचा विचार करुनच अपेक्षा कराव्यात. तसेच नुसतेच ध्येय ठरवून यश मिळत नसून त्यासाठी जिद्द आणि मेहनतीची जोड आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनीही स्वतःमधील क्षमता ओळखूनच ध्येय ठरविणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना किशोर वाणी म्हणाले की, आजच्या काळात शिक्षण महत्त्वाचे असले तरी शिक्षणासोबत संस्कारही तेवढेच महत्त्वाचे असल्याने संस्कारक्षम पिढी निर्माण करण्यासाठी पालकांची भुमिका महत्त्वाची आहे. यानंतर गिरीष कुलकर्णी यांनी यशस्वी करिअरसाठी कौशल्य विकास या विषयावर मार्गदर्शन करतांना सांगितले की, कोणत्याही कौशल्याची निवड करतांना आवश्यक कौशल्यांचा विचार करावा. पालकांनी पाल्यांचा कल जाणूनच पुढील करिअरची निवड करावी.

ग्रीन करिअर व उद्योगसंधी यावर मार्गदर्शन
तर दुसर्‍या सत्रात सायंकाळी कृषी विज्ञान केंद्राचे प्रकल्प प्रमुख डॉ.राजेंद्र दहातोंडे यांनी ग्रीन करिअर व उद्योगसंधी या विषयावर मार्गदर्शन करतांना सांगितले की, नंदुरबार जिल्ह्याची भौगोलिक स्थिती आमसुल, मिरची व तांदुळ उद्योग भरभराटीस येवू शकतो. कृषी क्षेत्रात विविध संधी असून विद्यार्थ्यांनी त्यात करिअर करावे. दुसर्या दिवशी सकाळच्या सत्रात अभियांत्रिकी व वैद्यकीय क्षेत्रातील विविध या विषयावर आशिष वाणी व विनायक ढोले यांनी मार्गदर्शन केले. प्रा.आशिष वाणी यांनी विद्यार्थ्यांनी नुसतेच अभियांत्रिकीकडे न वळता विज्ञानातही करिअरच्या विविध संधी असून त्यात करिअर करण्याचा सल्ला दिला.

निवडीची वाटचाल व पालकांची भुमिका
विनायक ढोले यांनी अभियांत्रिकी क्षेत्रातील करिअरच्या विविध वाटा व त्यासाठीची पात्रता याविषयी मार्गदर्शन केले. दुपारच्या सत्रात नाशिक येथील मानसोपचार तज्ञ अमोल कुलकर्णी यांनी शालेय शिक्षण-करिअर निवडीची वाटचाल व पालकांची भुमिका या विषयावर मार्गदर्शन करतांना पालकांनी पाल्यांकडून उगाच अवाजवी अपेक्षा न करता बौद्धिक क्षमता व मानसिकता जाणून घेवूनच करिअर करण्याचे सांगितले. समारोपीय सत्रात यजुर्वेंद्र महाजन यांनी करिअर स्पर्धा-व्यक्तीमत्त्व विकास या विषयावर पालकांशी व विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद साधला. प्रत्येक सत्राचे सुत्रसंचालन विद्यार्थ्यांनी तर आभार शिक्षकांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक, कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले.