करिअरच्या दिशा ठरवून वेळेचे नियोजन करा

0

जळगाव। आजच्या विद्यार्थ्यांसमोर खूप मोठी आव्हाने उभी आहेत. त्याला सामोरे जाण्याची तयारी ठेवा. पुढील वाटचालीसाठी महाविद्यालय तुमच्या सोबत आहे. भविष्यातील करियरच्या दिशा ठरवा. वेळेचे नियोजन करा आणि अष्टपैलू व्हा असा संदेश प्राचार्य डॉ. उदय कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना दिला. मूळजी जेठा महाविद्यालयात कला शाखेच्या वतीने आयोजित केलेल्या तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभामध्ये ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कला शाखेच्या समन्वयिका डॉ. प्रज्ञा जंगले, हिंदी विभागप्रमुख डॉ.सुरेश तायडे होते. यावेळी विद्यार्थ्यांपैकी घनश्याम राखपसारे, अतुल उभाळे, शुभांगी पांढरे, शुभम गरुड, वर्षा उपाध्ये, नेहा पवार, पंकज पाटील, गायत्री विसपुते यांनी महाविद्यालयातील तीन वर्षातील अनुभव, भावना आपल्या मनोगतातून व्यक्त केल्या.

कार्यक्रमात यांची होती उपस्थिती
महाविद्यालयात अभ्यासेत्तर उपक्रमांनी खूप शिकायला मिळाले अशा भावना त्यांनी व्यक्त उपस्थित विद्यार्थ्यांनी शिक्षकांप्रती व्यक्त केल्या. प्राध्यापकांपैकी डॉ. सुरेश तायडे, प्रा. रजनी बोंडे, प्रा. चारुता गोखले, डॉ. विद्या पाटील यांनी मनोगते व्यक्त केली. विद्यार्थ्यांच्या भावी वाटचालीसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांमुळे महाविद्यालय आणि प्राध्यापक मोठे होतात अशा भावना डॉ. सुरेश तायडे यांनी व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. विजय लोहार यांनी केले. या कार्यक्रमाला कला शाखेतील प्राध्यापक व तृतीय वर्षाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.