आयुक्त श्रावण हर्डीकर यांचे मत
पिंपरी चिंचवडः करिअर गाईडंस मेळावा प्रत्येक विद्यार्थी, तरूणाच्या आयुष्यातील अत्यंत महत्वाचा भाग असतो. विद्यार्थ्यांना आपल्या आयुष्याची दिशा ठरविण्यासाठी असे मेळावे उपयोगी ठरतात. करिअर गाईडंस् मेळावा विद्यार्थी, तरूणांचे भविष्य घडविण्याची ‘सुवर्णसंधी’ घेऊन आला असल्याचे मत पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी व्यक्त केले. थेरगाव प्रभागाच्या नगरसेविका मायाताई संतोष बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त करिअर गाईडंस् आणि व्यवसायिक करिअर शिक्षण मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार लक्ष्मण जगताप, उपमहापौर सचिन चिंचवडे, उद्योजक बाळासाहेब मातेरे, चाकण येथील कला जनसेटचे मनोज फुटाणे, नगरसेविका झामाताई बारणे, माजी विरोधी पक्षनेते संतोष बारणे, मच्छिंद्र तापकीर, भाजपाचे अमोल थोरात, माजी नगरसेवक मनोहर पवार, ज्योती भारती, विमल काळे, आदी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी घेतली 60 कोर्सेसची माहिती…
आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते विद्यार्थी, तरूणांना मार्गदर्शन करणार्या ‘तुमच्या भाग्याचे तुम्हीच शिल्पकार व्हा’ या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. या मेळाव्यास विद्यार्थी, तरूणवर्ग व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र व मिटकॉन फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने खास पालक, विद्यार्थी, व युवकांसाठी पिंपरी चिंचवड शहरात प्रथमच सर्वात मोठा असा हा शिक्षण मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात 60 हून अधिक कोर्सेसची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. यात प्रामुख्याने इंजिनअरिंग, आर्मी, एअर फोर्स, एअर होस्टेस, कॉम्प्युटर हार्डवेअर, नर्सिंग, हॉस्पिटँलिटी, स्पोर्टस्, फिल्म मेकिंग-अँक्टिंग, बीएसई, म्युझिक, फॅशन डिझायनिंग अशा असंख्य कोर्सेची संपूर्ण माहिती पालक व विद्यार्थ्यांना मिळाली आहे.
हे देखील वाचा
स्पर्धेत टिकण्यासाठी अभ्यास हवा…
हर्डीकर म्हणाले की, शाळा, महाविद्यालयात विद्यार्थ्यांना शिक्षण मिळते. परंतू भविष्य कोणत्या क्षेत्रात घडवायचे याची माहिती, मार्गदर्शन अशाच करिअर मेळाव्यातून उपलब्ध होते. दहावीत शिकत असताना अशाप्रकारच्या मेळाव्यात गेलो असताना भारतीय प्रशासकीय सेवेत रूजू होण्याचे ठरवले होते. त्यानुसार अभ्यास करून मी प्रशासकीय अधिकारी झालो. कल्पना चावला हिने लहानपणीच अंतराळवीर होण्याचे ठरवले होते. त्याचप्रमाणे मेरी कॉम ही देखील जिद्द, मेहनत करूनच बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चँम्पियन झाली. स्पर्धेच्या या युगात विद्यार्थ्यांना टिकण्यासाठी अशा मेळाव्याचा निश्चितपणे उपयोग होतो.
विद्यार्थी हे देशाचे भवितव्य…
नगरसेविका मायाताई बारणे यांनी देखील उपस्थित विद्यार्थी तसेच तरूणांना मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या की, विद्यार्थ्यांना योग्य वेळी करिअर निवडण्याची संधी उपलब्ध करून दिली तर आयुष्यात यशस्वी होण्यासाठी नक्कीच मदत होते. आजचे विद्यार्थी हे देशाचे पुढचे भवितव्य आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना करिअर निवडण्यास मोठी मदत होणार आहे. भविष्यातही विद्यार्थी आणि तरूणांसाठी असे उपक्रम राबविले जाणार असल्याचे मायाताई बारणे यांनी सांगितले. या मेळाव्याचे आयोजन प्रगती शिक्षण संस्थेचे संचालक गणेश गुजर आणि जय गणेश नागरी पतसंस्थेचे संचालक अनिल बोरकर यांनी केले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल बोरकर यांनी केले. तर आभार शिंदे सर यांनी मानले.