करिअर व शिक्षणासाठी योग्य निर्णयाची गरज!

0

नुकताच दहावी व बारावी सीबीएसई व राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीचा निकाल लागला आहे. दहावीचा निकाल बाकी आहे. काही ठिकाणी पेढे व मिठाई वाटली जाईल, तर काही ठिकाणी अनपेक्षितपणे नको त्या प्रसंगांना सामोरे जावे लागू शकते. परीक्षेच्या निकालानंतर आशा-निराशेचे मळभ दरवर्षीच दाटतात. अलीकडच्या काळात पालकांच्या पाल्यांकडून जास्तीत जास्त गुणांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. आमच्या वेळेस असं नव्हतं बुवा, मुलगा फर्स्ट क्लास आला म्हणून आईने मोठ्या कौतुकाने गल्लीत पेढे वाटले होते. आम्ही पुढे काय करणार, पुढे कोण होणार?, याची मायबापाला चिंता नव्हती. कारणही तसंच होतं, मुलाला शिक्षणासाठी कुठे टाकावे हेही त्यांना माहिती नव्हते. आता ती परिस्थिती राहिलेली नाही.

गेल्या काही वर्षांपासून दहावीच्या परीक्षेमध्ये मुलींच्या गुणवत्तेची टक्केवारी वाढली आहे. सीबीएसई, स्टेट बोर्ड, आयसीएसई या तिन्ही अभ्यासक्रमांत मुलीच अव्वल ठरल्या आहेत. जळगावातून आयुषी पायघनने सीबीएसई दहावीत 99.60 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला. यंदा या परीक्षेच्या निकालाच्या टक्क्यांत घसरण झाली, 90.95 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. गेल्या वर्षी 96.95 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. 12 वीचाही निकाल यंदा 1 टक्का घसरला आहे. या परीक्षांमध्ये मुला-मुलींना मिळालेले गूण पाहून आश्‍चर्य वाटले. पूर्ण 100 टक्के गुणांच्या जवळपास जाणारी ही यादी निश्‍चितच विचारात टाकणारी आहे. नजिकच्या भविष्यात 100 पैकी 100 टक्के गुण मिळवणे सर्वसाधारण बाब समजली जाईल की काय असा विचार सहज डोक्यात येतो. असे झाले तर भविष्यात शालेय अभ्यासक्रमातील गुणवत्ता हाच यशाचा एकमेव निकष समजला जाणार आहे का?, असाही मुद्दा पुन्हा विचारात टाकणारा ठरतो.

सीबीएसईच्या विद्यार्थ्यांची गुण मिळवण्यात अशी परिस्थिती आहे, तर मग त्यांच्याखालोखाल इंग्लिश मीडियम, सेमी इंग्लिश मीडियम आणि शेवटी जिल्हा परिषदेच्या शाळा अशी वर्गवारीतील विद्यार्थ्यांनी किती गुण मिळवले पाहिजे, असा प्रश्‍न उभा होतो. आजच्या विद्यार्थ्यांचे मार्क्स पाहिले तर त्यांच्या बुद्धिमत्तेचे कौतुक वाटते, पण ज्यांना शालेय अभ्यासात फार गती नाही, त्यांची काळजीही वाटू लागते. सगळेच विद्यार्थी प्रत्येक गोष्टींसह अभ्यासात हुशार नसतात. जवळच्या एखाद्या विद्यार्थ्यांने चांगले गुण मिळवले, तर पालकांना आपल्या पाल्याला टोमणे मारायला सुरुवात करतात. भलेही त्यांनी त्यांच्या काळात ते सपास अथवा काठावर पास झाले असतील अगदी तरीही दडपण टाकण्याचा प्रयत्न करीत असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्येे न्यूनगंड निर्माण होऊन मनोमन आपण काही करू शकत नाही, हे शल्य त्यांना बोचत राहते. सत्तर-ऐंशी टक्के मिळवणारे विद्यार्थी ना घर का न घाट का ठरवायचे का? त्यामुळे ते पुढील करिअरसाठी योग्य निर्णय घेऊ शकत नाही. हल्ली मेरिट लिस्ट हा प्रकार प्रचलित झाला आहे. राज्यात पहिला, जिल्ह्यात पहिला, शाळेत पहिला, वर्गात पाहिला, कोचिंग क्लासेसमध्ये पहिला, असे कानावर पडत असल्याचे दिसून येते. आता तर 98 टक्के मिळवणारे एका जागेसाठी पाच जण हजर राहतात, आता काय त्या जागेसाठी स्पर्धा परीक्षा घेणार का? असा सवाल उपस्थित होतो.

विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झालेल्यांची अशा प्रकारे तारांबळ होत असेल, तर नापास झालेल्या विद्यार्थ्यांचे काय हाल होत असतील हे विचारायलाच नको. अनेक पालक तर मुलाला कमी मार्क्स मिळाले म्हणून घरात सुतक पाळल्यासारखे वागतात. निकालानंतर हल्ली मुले याचा परिणाम मनावर करून घेतात सुतक पाळायची वेळ येत असेल, तर काही घरांत पालकांनी काही बोलण्याच्या अगोदर टोकाचा निर्णय घेऊन आई बाबा मला माफ करा, मी तुम्हाला निराश केले, गुण कमी मिळाल्याने तुम्ही दुःखी झाला असाल आता मी तुम्हाला सोडून जात आहे, अशी सुसाइड नोट मागे टाकून जगाचा निरोप घेतात. त्यामुळे अशी दुर्दैवी वेळ कुणावरही येऊ नये म्हणून मिळालेल्या गुणांमध्ये समाधान मानून याच गुणांच्या आधारे पुढील करिअर व शिक्षणासाठी योग्य निर्णय घ्यावा.

आता काही दिवसांत दहावीचा निकाल आहे. तुमच्या घरात, नातेवाईकमध्ये, शेजार्‍यापाजार्‍यांमध्ये कुठेही अशी परिस्थिती दिसू शकते. ही फक्त 10वी, 12वीच नव्हे, तर इतर परीक्षांच्या निकालानंतरही असे चित्र तुम्हाला दिसू शकेल तेव्हा जिथे कुठे असाल, उगीच सांत्वनाचा अतिरेक नको, यात कुणी स्वतःपासून शून्यात हरवताना दिसले तर जरूर त्याला थोपवण्याचा प्रयत्न करा. जागृत करण्याचा प्रयत्न करा. धीर द्या. तुमच्या सल्ल्याने एखाद्याचे जीवन सुरक्षित राहून भविष्यात चांगला नागरिक, चांगला उद्योजक, चांगला समाजसेवक, चांगले पालक, चांगला व्यक्ती घडू शकतो. हे मात्र 100 टक्के निश्‍चित!
जितेंद्र कोतवाल – 9730576840