तैमूरच्या जन्मानंतर पहिल्या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी बाळंतपणानंतर वाढलेले वजन कमी करून करीना कपूर खान आता सज्ज झाली आहे. या चित्रपटाची निर्मिती अनिल कपूर यांची कन्या रिया कपूर, निर्माती एकता कपूरबरोबर करत आहे. सोनम कपूर यात प्रमुख भूमिकेत असणारच आहे. सोनमसोबतच मुख्य भूमिकेत करीना दिसणार असून, त्याचबरोबर स्वरा भास्कर आणि शिखा तलसानिया यांच्या पण भूमिका असून, ‘विरे दी वेडिंग’च्या शूटिंगसाठी सध्या सर्व अभिनेत्री राजधानी दिल्लीत पोहोचल्या आहेत.
काही दिवसांपूर्वीच करीना ती करत असलेल्या जाहिरातीसंदर्भात दिल्लीत गेली होती. त्यावेळी तिला बघण्यासाठी नऊ-दहा हजार लोकांची गर्दी झाली होती व त्यांना आवरताना नाकीनऊ आले होते. त्या गर्दीमुळे करीनाची कारदेखील पुढे सरकू शकत नव्हती. शेवटी कसेबसे तिला या गर्दीतून बाहेर काढले गेले. ‘विरे दी वेडिंग’ रोड-ट्रिप फिल्म असून दिल्ली आणि आजूबाजूच्या परिसरात बरेच आउटडोअर शूटिंग होणार आहे. त्यामुळे या प्रसंगापासून धडा घेत चित्रपटाच्या टीमने करीना कपूरच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. चित्रपटाच्या सेटवर एकट्या करीनासाठी 20 अंगरक्षकांना तैनात करण्यात आले आहेत. करीनाचे दिल्लीतील वास्तव्य साधारण महिनाभरासाठी असेल व दुप्पट केलेल्या सुरक्षेमुळे माणसेच काय एखादा मच्छरही तिच्या आजूबाजूला फिरकू शकणार नाही.