नवापूर। करोडो रूपए खर्च करून देखील राष्ट्रीय महामार्गाची दुरुस्ती करताना निकृष्ट काम झाल्याने वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. दुरूस्ती संदर्भाच्या निवेदनाची दखल न घेतल्यास मंगेश येवले यांनी राज्य मार्ग प्राधिकरण विभागास आंदोलनाचा इशारा दिला आहे. याबाबत त्यांनी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण विभागास दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरील जळगाव ते कोंडाईबारी नवापूर सीमा तपासणी नाक्यापर्यंतच्या महामार्गावरील पडलेल्या खड्डे दुरुस्तीसाठी संदर्भात सन 2015 मध्ये 15 करोड रुपये मंजूर करण्यात आले होते.
मोठ्या प्रमाणात संगनमताने भ्रष्टाचार
त्याप्रमाणे संबंधित ठेकेदाराने काम सुरू केले होते. मात्र कामात गुणवत्ता नसून ठेकेदार मनमानी काम करीत असल्याचे वेळोवेळी लेखी व तोंडी स्वरूपात तक्रार करून देखील संबधीत अधिकारी व ठेकेदाराने त्याची दखल न घेतल्याने निकृष्ट दर्जाचे काम करून मोठ्या प्रमाणात संगनमताने भ्रष्टाचार केला आहे, असा आरोप निवेदनात केला आहे. त्यामुळे वर्षाच्या आतच या महामार्गाची दयनिय अवस्था झाली आहे. या महामार्गावर रोज अपघात होत असून अनेकांचे बळी महामार्गावरील खड्डे घेत असून हा महामार्ग मृत्यू मार्ग झाला आहे. या महामार्गावरील खड्डे कोणाला का दिसत नाहीत? असा सवाल केला जात आहे. 30 मे पर्यंत बेडकी ते कोंडाईबारी पर्यंत रस्त्यावरील खड्डे दूरूस्ती न केल्यास 1 जून पासून अर्धनग्न होउन भिक मांगो आंदोलन करण्यात येईल असा इशारा येवले यांनी दिला आहे.