करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूसंख्येत भारताने चीनलाही मागे टाकले

0

नवी दिल्ली – देशात करोनाबाधित रुग्णसंख्या १ लाख ६५ हजारांवर पोहोचली असून करोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांच्या यादीत भारत नवव्या स्थानावर पोहोचला आहे. चिंताजनक बाब म्हणजे करोनाबाधितांच्या मृत्यूसंख्येत भारताने चीनलाही मागे टाकले आहे. देशातील रुग्णसंख्येने आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे. गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल ७,४६६ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आता भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या १६५७९९ वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात ४७०६ लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत ७,४६६ नवीन कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या १,६५,७९९ वर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा चार हजारांवर पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी ८९९८७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर ७११०५ रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

रुग्णसंख्येत भारत नवव्या स्थानी

करोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला असून १७ लाख रुग्ण आहेत. करोनाबाधित रुग्णसंख्येत भारत नवव्या स्थानी असून भारताच्या आधी ब्राझिल, रशिया, इंग्लंड, स्पेन, इटली, फ्रान्स आणि जर्मनीचा क्रमांक आहे. चीन १४ व्या क्रमांकावर असून तुर्की, इराण आणि पेरु अनुक्रमे १०, ११ आणि १२ व्या क्रमांकावर आहेत. मृत्यूंच्या संख्येतही अमेरिकाच पहिल्या क्रमांकावर असून आतापर्यंत १ लाखाहून अधिक करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेनंतर अनुक्रमे इंग्लंड, इटली, फ्रान्स, स्पेन, ब्राझिल, बेल्जिअम, मेक्सिको, जर्मनी आणि इराण पहिल्या १० देशांच्या यादीत आहेत. भारत मृत्यूसंख्येत १३ व्या स्थानी आहे. ११ आणि १२ व्या क्रमांवर कॅनडा आणि नेदरलँड आहेत. भारतामध्ये करोनाच्या आतापर्यंत ३३ लाख चाचण्यात करण्यात आल्या आहेत. तुलनेत अमेरिकेत १.५ कोटी, रशियात ९७ लाख, जर्मनीत ४० लाख, इंग्लंडमध्ये ३८ लाख, इटलीत ३६ लाख आणि स्पेनमध्ये ३५ लाख कोव्हिड चाचण्या करण्यात आल्या आहेत. लोकसंख्येच्या तुलनेच चाचण्यांचं प्रमाणं पाहिलं जात तेव्हा तेव्हा भारत पहिल्या १०० देशांतही आढळत नाही अशी माहिती पीटीआयने दिली आहे.