करोना विरुध्दच्या युध्दात ‘ऑर्डिनन्स फॅक्टरी’ची उडी

0

जळगाव – कोरोना विरुध्द पुकारलेल्या युध्दात आता देशभरातील ऑर्डिनन्स फॅक्टरीज देखील सज्ज झाल्या आहेत. देशभऱात करोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून वाढत्या वैद्यकीय गरजांची पूर्तता करण्यास खासगी कंपन्या अपुर्‍या पडत आहेत. त्यामुळे देशाची गरज भागविण्यासाठी ऑर्डिनन्स फॅक्टरीज पुन्हा धावून आल्या आहेत. इतर वेळी युद्धासाठी दारुगोळा तयार करणार्‍या या कारखान्यांमधून आता करोनाविरोधातील या युद्धासाठीचीही साधनसामुग्री तयार केली जात आहे. मास्क, संरक्षक पोषाखापासून व्हेंटिलेटर्सपर्यंतची निर्मिती केली जात आहे.

पहिल्या टप्प्यात पाच हजार लिटर सॅनिटायझर्स, पाच हजार कव्हरऑल व एक लाख मास्कची निर्मिती सुरू करण्यात आली आहे. त्यानंतरही गरजेनुसार ही निर्मिती सुरूच राहणार आहे. मास्क बनिवण्याचे काम शहाजहानपूर व औडी (चेन्नई) येथील ऑर्डिनन्स फॅक्टरीवर सोपविण्यात आले आहे. कव्हरऑल व व तंबूंच्या निर्मितीसाठीची जबाबदारी कानपूर येथील ऑर्डनन्स इक्विपमेंट फॅक्टरीवर सोपविली आहे. सॅनिटायझर्स जबलपूर खमारिया व इटारसी येथील ऑर्डिनन्स फॅक्टरीमध्ये बनविण्यात येणार आहेत. व्हेंटिलेटर्सच्या उत्पादनाची जबाबदारी हैदराबाद येथील मेडकच्या ऑर्डिनन्स फॅक्टरीवर सोपविण्यात आली आहे.

विलगीकरण कक्षही तयार

करोनाच्या रुग्णांची संख्या वाढल्यास देशभर अधिकाधिक विलगीकरण कक्षांची गरज भासणार आहे. ती लक्षात घेत देशभरातील ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या हॉस्पिटलमध्ये विलगीकरणाच्या (आयसोलेशन) एकूण २८५ खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. यापैकी महाराष्ट्रात खडकी, अंबाझरी व अंबरनाथ येथे प्रत्येकी २५ खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. हे सर्व कक्ष जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकांनुसारच बनविण्यात आले आहेत.