मुंबई । कर्करोगाशी लढण्यास 69 टक्के लोक आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्याची चिंताजनक बाब उघडकीस आली आहे. ‘फ्यूचर जनरली इंडिया लाईफ इन्शुरन्स’ (एफजीआयएलआय) ने अलिकडेच ‘ईप्सोस’ या आघाडीच्या जागतिक संशोधन संस्थेच्या सहयोगाने राष्ट्रीय स्तरावरील ‘कॅन्सर फायनान्शिअल प्रिपेअर्डनेस सर्व्हे’च्या निष्कर्षाची घोषणा केली. त्यातून हा धक्कादायक निष्कर्ष समोर आला आहे. या सर्वेक्षणाच्या माध्यमातून दोन विविध समुहांचा अभ्यास करण्यात आला. 11 शहरांमधील 25 आणि त्यावरील लोकांचा यामध्ये समावेश करण्यात आला होता. तीनपैकी दोन कर्करुग्णांच्या कर्करोगाचे निदान तिसर्या किंवा चौथ्या टप्प्यात होत असल्याकारणाने वैद्यकीय खर्च प्रचंड वाढतो’ असे ऑन्कोलॉजिस्टचे म्हणणे आहे.
याबाबत जनजागृती, आर्थिक तयारी आणि एकंदरीत मुल्यमापन करणे हे या सर्वेक्षणाचे उद्दीष्ट होते. या अहवालानुसार 69 टक्के रुग्णांना कर्करोगाचा सामना करण्यासाठी आर्थिक मदत मिळत नाही. 21 टक्के रुग्णांनी वैद्यकीय उपचारांसाठी विमा संरक्षण घेतलेले असते. 26 टक्के रुग्ण उपचारासाठी कर्ज घेतात. 31 टक्के लोक कर्करोगाचा सामना करण्यासाठी आर्थिक नियोजनाचा विचारही करीत नाही.