पालघर । जिल्ह्यातील तारापूर अणुशक्ती केंद्रामधून किरणोत्सर्गाचा प्रसार होत नाही असा दावा अणू ऊर्जा विभाग आणि न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआयएल) तर्फे केला जात आहे. तरीही तारापूर गावाच्या परिसरातील 300 नागरिकांच्या केलेल्या वैद्यकीय तपासणीत सुमारे 20 कर्करोगाचे संशयीत रुग्ण आढळले आहेत. गेल्या वर्षभरात तारापूर परिसरातील कॅन्सरवर उपचार घेणार्या 25 रुग्णांपैकी पाच नागरिकांचा मृत्यू झाला. त्या अनुशंगाने एका संस्थेच्या माध्यमातून नागरिकांकरिता विनामूल्य कॅन्सर तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ही धक्कादायक माहिती पुढे आली आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे
वातावरण आहे.
अभिनव जनसेवा असोशिएशन आणि इंडियन कॅन्सर सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने 10 ते 12 नोव्हेबर दरम्यान तारापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये विनामूल्य कर्करोग चिकित्सा शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये 25 वर्षावरील स्त्री व पुरुषांची कान, नाक, घसा, रक्त, डोळे, दात, छाती, महिलांच्या स्तन व गर्भाशयाच्या कर्करोगासंबधी तपासणी करण्यात आली. त्यावेळी कर्करोगाच्या संशयीत रुग्णांची संख्या ही चिंताजनक असून तारापूर अणुशक्ती केंद्राच्या किरणोत्सर्गाचाच हा परिणाम असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या शिबिरामध्ये दररोज 60 महिला व 40 पुरुषांची तीन तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी केली गेली. चार तंत्रज्ञांसह 16 जणांच्या टीमच्या सहाय्याने सलग तीन दिवस चाललेल्या या शिबिरामंध्ये एक्स-रे, रक्त तपासणी व इतर चाचण्या करण्यात आल्या.
गरिबांना मोफत उपचार
या तपासणी दरम्यान 15 ते 20 रुग्णांमध्ये कर्करोगासंबधी अधिक तपासणी करण्याची आवश्यकता असल्याचे समन्वयक अनुजकुमार वर्मा यांनी सांगितले. या सर्व संशयित कर्करोग रुग्णांचे रक्त तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यांना मुंबई येथील टाटा कॅन्सर रुग्णालयात पुढील तपासणीसाठी बोलविण्यात येणार आहे. गरिबांना या
ठिकाणी मोफत कर्करोगावर उपचार देण्यात येतील असेही ते म्हणाले. या शिबिरा दरम्यान आमदार अमित घोडा, केतन पाटील, उत्तम पिंपळे, सुधीर तामोरे, मेघन पाटील, कुंभारे आदी मान्यवरांनी उपस्थिति दर्शवली.