मुक्ताईनगर । प्रचंड तालुक्यातील मध्यप्रदेश राज्याच्या सिमेलगत असलेल्या कर्की या गावातील सामान्य शेतकरी दशरथ सिताराम पाटील यांच्या घरात धाडसी घरफोडी होऊन 1 लाख 78 हजारांचे एैवज चोरट्यांनी लंपास केले आहे. ही घटना सोमवारी 2 रोजी मध्यरात्रीस घडली. पाटील कुटुंब हे भरवस्ती राहतात समोरील घराच्या दाराची कडी लावून रात्री पाऊस सुरु असल्याची संधी साधत चोरट्यांनी घरफोडी केली.
घरफोडीत 80 हजार किंमतीचे 4 तोळा सोन्याची पोत, 30 हजार किंमीचे 15 ग्रॅम सोन्याची हार, 12 हजार किंमतीचे 5 ग्रॅम कानातील साखळ्या, 10 हजार किंमतीचे कानातील टॉप्स, 2 हजार किंमीचे 1 ग्रॅम सोन्यासह 44 हजार रोख असे एकुण 1 लाख 78 हजार रुपयांचे एैवज चोरीस गेले आहे. या भागातील श्रीकृष्ण मंदीरातील मृर्तीचे चांदीचे मुकुटही चोरट्यांनी चोरण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले आहे. या भागात चोरट्यांची टोळी सक्रीय असल्याचे बोलले जात आहे. घटनेची फिर्याद धनंजय दशरथ पाटील यांनी दिली असून घटनास्थळी पोलीस निरीक्षक कडलग, पोलीस उपनिरीक्षक हेमंत कडूकार यांनी भेट देऊन घटनास्थळावरुन वस्तुवरील हाताचे ठसे घेतले आहे.
चोरीचा तपास जलद करणार
चोरीचा तपास जलद गतीने करण्याचे आश्वासन कडलग यांनी दिले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षीच्या चोरीच्या घटनेबाबत पोलीसांसमोर आव्हान निर्माण झाले आहे. मध्यप्रदेशची सिमा लगत असल्याने चोरट्यांनी मध्यप्रदेशकडे पलायन केले असल्याचे तर्क लावण्यात येत आहे. याबाबत मुक्ताईनगर पोलीस स्टेशनशला भादवी 380, 457 नुसार अज्ञात चोरट्यां विरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कडूकार करीत आहे.