कर्जतच्या कुपोषणग्रस्त बालकांना अलिबागची हवा मानवेना

0

कर्जत । कर्जत तालुक्यातील वाढते कुपोषण लक्षात घेता त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयातील बाल चिकित्सा केंद्रात उपचार करावेत, असा प्रयत्न 31 ऑक्टोबर रोजी केला गेला. कर्जत तालुक्यातील कुपोषित 26 आणि अन्य 4 बालकांना अलिबाग येथे चिकित्सा केंद्रात दाखल करण्यासाठी नेले. पण दुपारी 12 वाजता अलिबागला पोहोचलेली बालके सायंकाळी 7 वाजता पुन्हा कर्जतला परत आली. दरम्यान, अलिबागचे वातावरण मानवत नसल्याने सर्व बालके आपल्या घरी पोहोचली असून, मोठ्या प्रमाणात कुपोषण असलेल्या कर्जत तालुक्यात आरोग्य विभागाने बाल चिकित्सा केंद्र सुरू करण्याच्या मागणीचा विचार प्रशासन करत आहे.

बालकांना मुंबई येथील केईएम रुग्णालयात उपचार घेण्याचा सल्ला
31 ऑक्टोबर रोजी तालुक्यातील अति कुपोषित अशा 26 आणि अन्य 4 अशा 30 बालकांना संबंधित कुपोषित बालकांच्या पालकांसह अलिबाग येथे नेण्यात आले. त्या त्या अंगणवाडी केंद्राच्या सेविका, एकात्मिक बालविकासच्या प्रकल्प अधिकारी निशिगंधा भवार, पर्यवेक्षिका एस. ए. तांबे, वैद्यकीय अधिकारी डॉ. सागर काटे यांची टीम कुपोषित बालकांसोबत होती. जिल्हा रुग्णालयात कुपोषित बालकांसाठी आरोग्य विभागाने बाल चिकित्सा केंद्र उभारले आहे. त्या केंद्रात दाखल होताच जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण समितीच्या सभापती उमा मुंढे, या विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी महेंद्र गायकवाड यांनी जिल्हा रुग्णालय गाठले. तेथे त्यांची आरोग्य तपासणी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व 30 बालकांची आरोग्य तपासणी बालरोग तज्ज्ञ यांनी केली. त्यावेळी त्यातील 26 सॅम श्रेणीच्या कुपोषित बालकांमध्ये 3 बालके यांच्यात वेगवेगळे आजार असल्याचे आढळून आले. त्या बालकांना मुंबई येथील केईएम रुग्णालयात उपचार करण्यासाठी सांगण्यात आले.

अलिबाग समुद्राजवळील खारे वारे हे कर्जतच्या लोकांना मानवत नाही. त्यामुळे कर्जतचे रुग्ण जिल्हा रुग्णालयात अलिबागला येत नाही. अलिबागपेक्षा मुंबई जवळ असल्याने कर्जतचे रुग्ण तिकडे सहज पोहोचतात. मात्र, कुपोषितसारखी लहान बालके मुंबईमध्ये नेऊन उपचार घेऊ शकत नसल्याने आम्ही येथील कुपोषण लक्षात घेऊन गेली अनेक वर्षे बाल चिकित्सा केंद्र कर्जतमध्ये सुरू व्हावे, अशी मागणी आरोग्य विभागाकडे करत आहोत.
– सुरेश लाड, आमदार कर्जत.