कर्जतमधील खुनाचा उलगडा

0

कर्जत । कर्जत शहरातील मानस कॉम्प्लेक्सचा वॉचमन धुरूपसिंग झपटसिंग कुमाल याची पत्नी लक्ष्मी यांचा नैसगिक मृत्यू झाला की हत्या झाली. अशी चर्चा होती. चार दिवसांच्या प्रयत्नांनंतर त्या महिलेचा खून तिच्या पतीनेच केला असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. किरकोळ भांडणातून हा खून झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. या कॉम्प्लेक्सच्या खोलीमध्ये धुरूपसिंग कुमाल आणि त्याची पत्नी लक्ष्मी आपल्या दोन मुलांसह राहत होती. पोलिसांना घटनास्थळी लक्ष्मी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळून आली होती. तिच्या बाजूला एक लोखंडी मांडणी पडली होती त्यामुळे हा घात की अपघात असा प्रश्‍न पोलिसांना पडला होता.

सीसीटीव्हीवरून तपास
पोलिसांच्या तपासात लक्ष्मीचा पती धुरूपसिंग कुमाल याच्याकडे चौकशी केली असता आपली पत्नी लक्ष्मी हिच्या डोक्यावर घरातील साहित्य ठेवलेली लोखंडी मांडणी पडली. त्यामुळे तिचा मृत्यू झाला असावा अशी दिशाभूल करणारी माहिती दिली होती. कुमाल प्रत्येक वेळी वेगवेगळी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल करत होता. मात्र वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे यांनी विश्‍वास न ठेवता त्यांनी शहरात असलेल्या सीसीटीव्ही फुटेज जमा करून त्याचा तपास केला. त्यावरून बचाव करणार्‍या धुरूपसिंग कुमाल याची चौकशी केली असता त्यानेच पत्नीचा खून केला आहे हे पोलिसांच्या लक्षात आले. शुक्रवारी पाचव्या दिवशी तशी कबुली त्याने दिली. सायंकाळी सहाच्या सुमारास त्याला अटक केली.