कर्जत : मागील वर्षभरात कर्जतमध्ये मोठ्या प्रमाणात मंगळसूत्र खेचणे, दिवसाढवळ्या घरफोड्या, रात्री दुकानाची शटर वाकवून होणार्या चोर्या, वाहनांची चोरी अशा एक ना अनेक चोर्यांचे प्रमाण वाढेल आहे. असे असूनही कर्जत पोलीस यंत्रणेला त्यांचा छडा लावण्यासाठी कर्जत पोलिसांनी व्यापारी, तसेच इमारतीतील रहिवाशांना आपापल्या परिसरात सीसीटीव्ही बसविण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक व्यापारी, रहिवासी तसेच काही लोकप्रतिनिधी पुढाकार घेत स्वखर्चाने त्या त्या प्रभागात सीसीटीव्ही बसवले परंतु सद्यस्थितीत यातील काही सीसीटीव्ही हे नादुरुस्त असून फक्त शोभेचे ठरत आहेत. यामुळे एखादा गुन्हा घडल्यास सीसीटीव्ही द्वारे घडलेल्या गुन्ह्याचा मागोवा घेण्यास अडचण होत आहे.
गुन्ह्यांच्या तपास लावण्यात पोलिसांना अपयश
रेल्वे मार्गावर कर्जत असल्याने शहरात गुन्हा करून त्वरित लोकल अथवा मेलने गुन्हेगाराला पळून जाणे सहज शक्य होते. त्यामुळे मागील काही काळापासून येथील गुन्हेगारीत लक्षणीय वाढ झाली आहे. काही वेळेस एका रात्रीत पाच ते सहा दुकाने फोडण्याच्या घटनाही घडल्या आहेत. तर मुद्रे दहिवली भरबाजारपेठेत सुद्धा दिवसा ढवळ्या घरफोड्या करून लाखो रुपयांचे सोने, रोख रकमा घेऊन चोरटे पसार झाले आहेत. याच प्रमाणे बँकेत भरणा करायला आलेल्या नागरिकांची दिशाभूल तसेच हातचालाखी करत लुटण्याचे प्रकारही घडले आहेत. मात्र या गुन्ह्यांच्या तपास लावण्यात पोलिसांना काही अंशी यश आले असले तरीही अनेक गुन्ह्यांच्या तपास आजही प्रलंबित आहेत.
वाढत्या गुन्हगारीला आळा घालण्यासाठी सीसीटीव्हीची अत्यंत गरज आहे. बँका ज्वेलर्स याचबरोबर सोसायट्यामध्येही दिवसा ढवळ्या होणार्या घरफोड्या लक्षात घेता सीसीटीव्ही लावणे अपेक्षित आहे. तसेच ज्या ठिकाणचे सीसीटीव्ही नादुरुस्त झाले आहेत त्यांची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी.
– संजय हजारे
पोलीस पाटील , भिसेगाव