कर्जदारांना दिलासा, हप्ता न भरण्याची मुभा तीन महिन्यांनी वाढवली

0

नवी दिल्ली – सर्वसामान्यांवरील कर्जाच्या हप्त्याचे ओझे वाढू नये यासाठी ते न भरण्याची मुभा तीन महिन्यांसाठी देण्यात आली होती. ती मुदत आता आणखी तीन महिन्यांसाठी वाढवण्यात आली आहे. आधी मार्च, एप्रिल, मे साठी ही सवलत देण्यात आली होती. आता आणखी तीन महिन्यांसाठी ही मुदत वाढवण्यात आली आहे. म्हणजे जून, जुलै आणि ऑगस्टपर्यंत कर्जाचा हप्ता न भरण्याची मुभा असेल. कर्जांवरील व्याज भरण्यास दिलेली स्थगिती आणखी तीन महिन्यांनी वाढवण्यात आलेली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी आज पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.

करोनाच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. रेपो दरात ४० बेसिस पॉईंट्सची कपात करण्यात आल्याची माहिती रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी दिली. रेपो रेट आता ४.४ टक्क्यावरुन ४ टक्के करण्यात आला आहे. रिव्हर्स रेपो रेट ३.३५ टक्क्यापर्यंत कमी करण्यात आला आहे. महागाई दर नियंत्रणात राहील अशी आरबीआयला अपेक्षा आहे. संपूर्ण जगाचा प्रवास मंदीच्या दिशेने सुरु आहे असे शक्तीकांत दास यांनी सांगितले.