कर्जबाजारीपणामुळे तापी नदीत भोकरच्या वृध्द शेतकर्‍याची आत्महत्या

0

जळगाव : आईला शौचालयास जावून येतो सांगून तापीनदीकाठी गेलेल्या फुलचंद ताराचंद सोनवणे वय 69 रा. भोकर ता.जळगाव या वृध्दाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली आहे. दरम्यान सहा एकर शेतीसाठी तीन लाखांचे कर्ज घेतले मात्र कर्जाची परतफेड होत नसल्याने त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती नातेवाईकांकडून मिळाली आहे.

भोकर येथील फुलचंद सोनवणे हे पत्नी कासूबाई, आई भिकूबाई यांच्यासह भोकरमध्ये राहत होते. सुनील व बापू अशी दोन्ही मुले असून ते नाशिक येथे कंपनीत कामाला आहे. कुटूंबासह ते त्याच ठिकाणी राहतात. पत्नी कासूबाई ही नाशिक येथे मुलांकडे गेलेली होती. तर घरी आई व फुलचंद दोघेच होते. गुरुवारी रात्री फुलचंद सोनवणे हे आईला शौचालयास जातो असे सांगून घराबाहेर पडले. पुन्हा परत न आल्यानंतर आईने फुलचंद यांचे भाऊ राघव यांना माहिती दिली. त्यांनी गावातील नागरिकांसमवेत शोध घेतला मात्र मिळून आले नाही. शुक्रवारी पहाटे 5.30 वाजेच्या सुमारास फुलंचद सोनवणे यांचा मृतदेह नदीकाठी तरंगतांना आढळून आला. नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात हलविला. याठिकाणी शवविच्छेदनानंतर मृतदेह ताब्यात घेतला. तालुका पोलीस ठाण्याचे ईश्‍वर लोखंडे व संदीप पाटील यांनी पंचनामा केला. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.