कर्जबाजारीपणामुळे वडीलांच्या पाठोपाठ शेतकरी मुलाचीही आत्महत्या

0

सामोडे येथील घटनेने ग्रामस्थ सुन्न ; वारंवारच्या शेतीतील अपयशामुळे मनोबल खालावले

पिंपळनेर – सामोडे साक्री येथील विठ्ठल नगरातील शेतकरी दीपक गुलाबराव घरटे वय 41 यांनी राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी 12 वाजेच्या सुमारास समोर आली. दरम्यान दिपक घरटे यांचे वडील गुलाबराव गेंदा घरटे यांनीही काही दिवसांपूर्वी कर्जबाजारीपणामुळेच आत्महत्या केल्याची माहिती मिळाली आहे.

कै गुलाबराव गेंदा घरटे यांचा मुलगा दिपक हा वडिलांचा वारसा घेऊनच शेती करत होता. पण गेल्या तीन-तिन वर्षांपासून पडीत असल्याने काही उत्पन्न येत नव्हते. कर्ज कमी होण्या ऐवजी वाढतच होते त्याची मनस्थिती खालावत होती. भाऊ बाहेर गावी असल्याने पत्नी आई मुलं असा परिवार सामोड्याला राहून शेती व्यवसाय करत होता. वारंवारचे अपयश पचविणे अवघड झाल्याने त्यांची मनस्थिती खालावली होती.

गावी गेलेली आई परतल्यावर प्रकार उघड
दिपक यांची आई मोठ्या भावाकडे गेली होती. तर पत्नी ही दोन दिवसांपूर्वीच माहेरी गेली आहे. घरी एकटे असल्याची संधी साधत दिपक यांनी सकाळी 11 वाजेच्या सुमारास राहत्या घरात छताला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला. सायंकाळी चार वाजता आई गावाहून परतली. घराचा दरवाजा बंद असल्याने बाहेरून आवाज दिला परंतु घरातून काही आवाज येत नव्हता व आतून कडी लावलेली असल्याने दरवाजाही उघडत नव्हता. आईने गल्लीतील मुलांना सांगून मागच्या दरवाजाच्या भिंतीवरून मुलांना घरात कडी उघडण्यासाठी पाठवले असता आत्महत्येचा प्रकार समोर आला. प्रकार लक्षात येताच घरी आलेल्या आईने हंबरडा फोडला. दिपकच्या पश्‍चात पत्नी ,दोन मुले ,आई ,एक भाऊ, एक बहीण ,भावजाई, पुतणे असा त्यांचा परिवार आहे.दिपकचे काका साहेबराव गेंदा घरटे यांनी पोलीस पाटील यांच्या मार्फत पिंपळनेर पोलीस स्टेशनला खबर दिली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा करून मृतदेह पिंपळनेर येथील सरकारी दवाखान्यात शवविच्छेदनासाठी रवाना केले. रात्री ठीक नऊ वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.