कर्जबाजारी मल्ल्या म्हणतो ‘माझ्याकडून पैसे घ्या पण जेट एअरवेजला वाचवा’

0

नवी दिल्ली – भारतीय बँकांना हजारो कोटींचा गंडा घालून परदेशात फरार झालेला व्यावसायिक विजय माल्याने सरकारी बँकांनी माझ्याकडून पैसै घ्यावेत आणि आर्थिक संकटात सापडलेल्या जेट एअरवेजला वाचवावे, अशी ऑफर दिली आहे. जेट एअरवेज कंपनी आर्थिक अडचणीत असून कंपनीचे चेअरमन नरेश गोयल यांनी सोमवारी राजीनामा दिला आहे. कर्जदात्यांकडून 1 हजार 500 कोटी रुपयांची मदत मिळावी म्हणून नरेश गोयल आणि त्यांची पत्नी अनीता गोयल यांनी पद सोडले होते.

बँकांचे हजारो कोटी रुपये बुडवलेल्या माल्याने आज एकापाठोपाठ एक ट्विट करून जेट एअरवेजला मदत करणाऱ्या सरकारने किंगफिशर एअरलाईन्सला का मदत केली नाही, असा सवाल उपस्थित केला. यावेळी बँकांची थकीत रक्कम परत करण्याच्या ऑफरचाही माल्याने पुनरुच्चार केला. मी कर्नाटक उच्च न्यायालयासमोर माझ्या संपत्तीचे विवरण दिले आहे. त्यातून सरकारी बँका आणि अन्य कर्जदात्यांचे पैसे परत करता येतील. बँका माझे पैसे का स्वीकारत नाहीत, हा प्रश्नच आहे. त्यांनी बाकी काही केले नाही तरी या पैशातून जेट एअरवेजला मदत करता येईल, असेही माल्याने सांगितले.