कर्जमाफीचा निर्णय घाईगडबडीत : राजू शेट्टी

0

मुंबई: राज्यसरकारने शेतकऱ्यासाठी २ लाख रुपयांपर्यंत कर्ज माफीची घोषणा केली होती. शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी नाराजी व्यक्त करत हा निर्णय घाईगडबडीत निर्णय न घेता संपूर्ण माहिती घेऊन कर्जमाफीचा निर्णय घेण्याची गरज होती. अजूनही वेळ गेलेली नाही, पुन्हा विचार करुन कर्जमाफीच्या योजनेत बदल करण्याची विनंती देखील राजू शेट्टी यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

राज्यातील शेतकऱ्यांचे सप्टेंबर, २०१९ पर्यंतचे दोन लाख रुपयांपर्यंतचे पीककर्ज माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. त्यासाठी महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना मार्च, २०२० पासून लागू होईल, असे उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे. मात्र कर्जमाफीच्या योजनेत व्याज आणि मुद्दल मिळून दोन लाखांपेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी अपात्र करण्यात आल्याने स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

राजू शेट्टी एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले की, उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या बांदावर शेतकऱ्यांचे अश्रु पुसण्यासाठी गेले होते. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना मी तुम्हाला पूर्णपणे चिंतामुक्त आणि कर्जमुक्त करतो असे आश्वासन दिले होते. परंतु कर्जमाफीच्या या योजनेअंतर्गत दिलेलं आश्वासन पूर्ण होताना दिसत नसल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले.