कर्जमाफीची श्वेतपत्रिका काढा

0

वर्धा । सरकारने शेतकरी कर्जमाफी दिली, पण ती कोणाला दिली हे कळायला मार्ग नाही. त्यामुळे या सरकारने नेमकी कर्जमाफी कोणाला दिली आहे हे लोकांना कळू द्या ना ? त्यासाठी एक श्वेतपत्रिका काढा अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी वर्धा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आयोजित हल्लाबोल आंदोलनादरम्या त्या बोलत होत्या. नवीन काय केले हे सांगण्यापेक्षा जुने उकरून काढण्यात भाजप सरकार व्यस्त असल्याची टीका अजित पवार यांनी केली आहे.

नवरदेवाचा सहभाग
राष्ट्रवादी कॉंग्रेसचा हल्लाबोल मोर्चा आज जिल्ह्यातील भिडी येथे पोहोचला. या हल्लाबोल मोर्चामध्ये यवतमाळहून नागपूरकडे जाणार्‍या वरातीमधील नवरदेवाने सहभाग घेतला. चक्क आजच लग्न असणार्‍या नावरदेवही मोर्चात सामील झाल्याने तो चर्चेचा विषय ठरला आहे. दरम्यान हल्लाबोल मोर्चात वरातीसह सहभागी झालेल्या या नवरदेवांने कर्जमाफीला प्रत्यक्षात उतरविण्याची अपेक्षा यावेळी बोलून दाखविली. त्यानंतर या नवरदेवास खासदार सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्यासोबत सेल्फी काढण्याचा मोह काही आवरला नाही. त्यावेळी त्याने राष्ट्रवादीच्या या दोन नेत्यांसोबत आपला सेल्फी काढला. त्यावेळी अजित पवार यांनी नवरदेवाला चक्क पाचशे रुपयाची ओवाळणीही घातली.

आश्‍वासने अपूर्ण
हल्लाबोल आंदोलन सुरू झाल्यापासून भाजप सरकारला उत्तर काय द्यावे हे सुचत नाही आहे. सर्वत्र सरकारविरोधात असंतोष पसरलेला आहे. आम्ही पंधरा वर्ष सरकारमध्ये होतो. त्या गोष्टी हे उखरून सांगत आहेत. मात्र या सरकारला जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करता आली नाहीत. शेतकर्‍यांच्या सम स्या अद्याप सुटल्या नाहीत. त्यामुळे या सरकारने जुने उखरून काढण्यापेक्षा नवीन काय केले हे जनतेला सांगाण्याचे आवाहन अजित पवार यांनी यावेळी केले.

आदिवासी नृत्य 
राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून सरकारविरोधात सुरु असलेल्या हल्लाबोल आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी पारंपरिक आदिवासी नृत्यावर ठेका धरला. हल्लाबोल आंदोलनाच्या दिवसाची सुरुवात वर्ध्यातून झाली. या आंदोलनात बिडी गावजवळ मेळघाटाहून आलेले काही आदिवासी मंडळी सहभागी झाले. कोरकू आदिवासींच्या गादुली सुसुन या पारंपरिक नृत्याने हल्लाबोल पदयात्रेला सुरुवात झाली. यावेळी सुप्रिया सुळेंनी आदिवासींचं एक वाद्य हातात घेत त्यांच्यासोबत ठेका ठरला तर साडी नेसलेल्या एका चिमुकलीचं कौतुकही केलं. तर राष्ट्रवादीच्या नेत्या चित्रा वाघ यांनीही पदयात्रेदरम्यान आदिवासी मंडळींसोबत फुगडी घातली.