कर्जमाफीचे अर्ज भरण्यात अमरावती विभाग पिछाडीवर

0

बुलडाणा । शासनाने घोषित केलेल्या कर्जमाफी योजनेत पात्र असलेल्या शेतकर्‍यांची आकडेवारी मोठी आहे. या आकडेवारीच्या तुलनेत ऑनलाईन अर्ज भरण्यात अमरावती महसूल विभाग पिछाडीवर असल्याचे गंभीर चित्र आहे. अर्ज भरण्याची अंतिम मुदत जवळ आल्याने या कालावधीत सर्व शेतकर्‍यांचे अर्ज भरले जाण्याची शक्यता कमी असल्याने शेतकर्‍यांमध्ये चितेंचे वातावरण निर्माण झाले आहे. अमरावती विभागातील राज्य सरकारने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान सन्मान योजनेसाठी पात्र शेतकर्‍यांची संख्या ही लाखोंच्या घरात आहे. मात्र त्या तुलनेत 24 ऑगष्ट अखेरीस जेमतेम विभागातील एकूण 1 लाख 12 हजार 797 शेतकर्‍यांनीच ऑनलाईन अर्ज भरले आहेत. आज अखेरीस ऑनलाईन अर्ज भरणार्‍याची संख्या 48 हजार 664 पर्यंतच पोहचली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील 23 हजार 302 शेतकर्‍यांनी अर्ज सादर केले आहेत.

विविध कारणांमुळे कर्जमाफी अर्ज भरण्यास अडचणी
विभागाचे मुख्यालय असलेल्या अमरावती जिल्ह्याची कामगिरी चिंताजनक असून आज अखेर अर्ज भरणार्‍या शेतकर्‍यांची संख्या 18 हजार 366 इतकी आहे. वाशीम जिल्ह्यातील 13 हजार 927 शेतकर्‍यांनी अर्ज भरले आहेत. तसेच अकोला जिल्हा अर्ज भरणार्‍या शेतकर्‍यांच्या आकडेवारीत सर्वात पिछाडीवर असून तेथील फक्त 8 हजार 538 शेतकार्‍यांनीच अर्ज भरले आहेत. ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता लागणारी भरमसाठ कागदपत्रे, महा ई सेवा केंद्रे व आपले सरकार मधील तांत्रिक असुविधा शेतकर्‍यांना कागदपत्रे जमा करतांना लागणार कालावधी, करावा लागणारा प्रवास, मार्गदर्शनाची वाणवा, शासकीय यंत्रणांची अनास्था, लिंक मिळण्यात लागणारा दीर्घ कालावधी आदी विविध कारणांमुळे कर्जमाफी अर्ज भरण्याची गती मंदावली आहे. अर्ज सादर करण्याची मुदत 15 सप्टेंबर म्हणजे जेमतेम 20 दिवसावर आल्याने यंत्रणा व राजकीय पक्षांनी यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.