ऑनलाइनचा गोंधळ, शेतकर्याचा संताप
मुरबाड । महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत गेले काही दिवस संपूर्ण महाराष्ट्रात कर्जमाफीचे ऑनलाइन फॉर्म भरण्यात येत आहेत. हे फॉर्म भरत असताना शेतकर्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यामुळे शासनावर टीकेची झोड उठली आहे. मुरबाड तालुक्यातही ऑनलाइनच्या घोळाने शेतकरी परेशान आहेत.
मुरबाड तालुक्यातील आसोले गावातील असेच एक शेतकरी कर्जदार वामन तुकाराम कोर (७७) हे कर्ज माफी जाहीर झाल्यापासून आपला स्वतःचा कर्ज माफीचा ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी मुरबाड मधील सर्वच अधिकृत केंद्रांमध्ये हेलपाटे मारत आहेत. परंतु, बायोमेट्रिक मशीनवर त्यांच्या बोटांचे ठसे मॅच होत नसल्याकारणाने त्यांना फॉर्म अद्यापही भरता आलेला नाही. तसेच त्यांच्या आधार कार्डला त्यांचा मोबाईल नंबर संलग्न नसल्याने त्यांना फॉर्म भरताना अडचणी येत आहेत. त्यामुळे त्यांनी राज्य सरकारच्या या कर्जमाफीच्या महाप्रतापबद्दल संताप व्यक्त केला आहे.
हे तर बुरे दिन
जनशक्तिशी बोलताना वामन कोर म्हणाले की,’ ज्या दिवशी कर्ज माफी जाहीर केली त्या दिवसापासून बुरे दिन आले आहेत. त्यामुळे माझ्यासारख्या ७७ वर्षांच्या वयोवृद्ध म्हातार्याला ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी १०० फेर्या माराव्या लागतात.’ अशाच फेर्या राज्यातील सर्वच वयोवृद्धृ शेतकरी आणि महिला वर्ग आणि आजारी माणसांना फेर्या माराव्या लागत आहेत. त्यामुळे हे मायबाप सरकार शेतकर्याच्या पाठीशी राहणार की नाही किंवा ही कर्ज माफी नसून कर्ज फाशी होईल का? अशा चर्चेला उधाण आले आहे.
त्यामुळे सरकारने पुन्हा ७ दिवसांची मुदत वाढवली असली तरी सदर कामासाठी मागितलेली कागदपत्रे आजही काही शेतकर्यांकडे उपलब्ध नाहीत. त्यामुळे त्यांना फॉर्म भरता येत नाही. ज्या शेतकर्यांचे आई वडील १०० वर्षांपूर्वी किंवा त्याहीपेक्षा अगोदर मयत झाले आहेत त्यांचे मृत्यू दाखले मिळणे अशक्य असल्याने अशा शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार आहेत. तरी या सरकारने ऑनलाइनऐवजी ऑफलाइनला मान्यता द्यावी अशी मागणी पुढे येत आहे.