मुंबई । राज्यात केलेली ऐतिहासिक कर्जमाफी जाहीर केल्यापासून वादाच्या भोवर्यात आहे. कर्जमाफीसाठी ऑनलाईन प्रक्रियेद्वारे राज्यात आजपर्यंत 71 लाख 40 हजार शेतकर्यांनी कर्जमाफीचे अर्ज दाखल केले असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. या अर्जामध्ये दहा लाख अर्ज बोगस आहेत अशी माहितीही यावेळी चंद्रकांत पाटील यांनी दिल्याने त्यांच्यावर टीकेचा भडिमार केला जात आहे. चंद्रकांत पाटील यांचे हे विधान सरसकट शेतकर्यांना बोगस ठरविणारे असून अत्यंत बेजबाबदार वक्तव्य असल्याचे मत शेतकरी अभ्यासकांनी व्यक्त केले असून सोशल मीडियात देखील याचे पडसाद उमटले आहे. जर शेतकरी बोगस असेल तर फॉर्मच भरला जात नाही, अशी स्थिती असताना एवढे शेतकरी बोगस कसे? असा सवाल उपस्थित केला जात आहे. जे खरे शेतकरी आहेत त्यांचेही अर्ज ऑनलाईनच्या गोंधळामुळे भरले जातील की नाही, अशी स्थिती असताना हे विधान चुकीचे असल्याचे म्हटले जात आहे. आत्तापर्यत सुमारे सुमारे 50 लाख शेतकर्यांनी ऑनलाईन कर्जमाफीसाठी अर्ज दाखल केले आहेत, यात प्रत्येक कुटुंबातील पती आणि पत्नी असे देखील वेगवेगळे अर्ज दाखल केले आहेत. 15 सप्टेंबरला आता केवळ 3 दिवस राहीले असताना आणकी 10 टक्के अर्ज आले तरी 60 लाखापर्यत अर्ज येऊ शकतात.
…तर अर्ज स्वीकृत कसे झाले?
शेतकरी कर्जमाफीचे अर्ज भरताना अनेक अडचणी येत आहेत. केवळ बोगस अर्ज भरणारांना अडचणी येत आहेत. यासाठी शेतकरी नेते आणि विरोधकांकडून वारंवार सुधारणा आणि वेळमर्यादा वाढवून देण्याबाबत मागणीही केली गेलेली आहे. अर्ज भरण्यासाठी चारच दिवसांची मुदत शिल्लक आहे. अर्ज भरण्याच्या कठीण प्रक्रियेमुळे अनेक शेतकर्यांना अद्यापही अर्ज दाखल करता आलेले नाहीत. फॉर्म भरताना संबंधित शेतकर्यांचे आधार कार्ड, बोटांचे ठसे, उतारे पाहूनच फॉर्म भरला जात आहे.
शेतकर्यांना बोगस म्हणणारे सरकार शेतकर्यांबाबत असंवेदनशील आहे. मंत्र्यांचे हे वक्तव्य म्हणजे कर्जमाफी बद्दलची त्यांची नकारात्मक मानसिकता दाखवते. कर्जमाफीसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली नसतांना अद्याप अर्जाची छाननी झाली नसतांना सरकारने 10 लाख बोगस शेतकर्यांचा शोध कसा लावला.
– धनंजय मुंडे, विरोधी पक्षनेते
ऑनलाईन अर्ज भरताना अडचणी असलेले सर्वच शेतकर्यांना महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बोगस ठरवून टाकले आहे. त्यांचे हे विधान या शेतकर्यांच्या जखमांवर मीठ चोळणारे आहे. शेतकर्यांचा अंत न पाहता पाटील यांनी केलेल्या विधानाबद्दल त्यांनी शेतकर्यांची माफी मागावी.
– डॉ. अजित नवले, शेतकरी सुकाणू समिती समन्वयक
एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकरी बोगस आहेत तर त्या शेतकर्यांची नावे जाहीर करा. गाव, तालुका, जिल्हा स्तरावर ही नावे घोषित करा. बोगस शेतकर्यांचे कोण समर्थन करेल? जर शेतकरी बोगस असतील तर कारवाई होणे आवश्यक आहे.
– विजय जावंधिया, शेतकरी नेते