कर्जमाफीच्या दिशेने पावले…

0

जळगाव। सरकार शेतकर्‍यांच्या कर्जमाफीच्या बाजूने असून त्या दिशेने पावले उचलत आहे. लोकांना पाणी मिळाले पाहिज याचे गांभीर्य प्रशासनाने ठेवणे गरजेचे असून तसे नियोजन करावे. शेतकर्‍यांना कर्ज देण्यासाठी पैसा कमी पडू देणार नसल्याचे आश्वासन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा खरीप आढावा बैठकीमध्ये दिले . यावेळी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे, जिल्हा परिषद अध्यक्षा उज्वला पाटील, विभागीय आयुक्त एकनाथ डवले, खासदार रक्षा खडसे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिककुमार पांडेय, जिल्हाधिकारी राजेनिंबाळकर, आमदार किशोर पाटील, आमदार राजुमामा भोळे, आमदार चंदू पटेल, जिल्हा परिषद उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन उपस्थित होते.

जिल्हा बँक अडचणीत
जिल्हा बँक अडचणीमध्ये सापडली असून बँकेकडे सध्या पैसे नसल्याचे आमदार किशोर पाटील यांना सांगितले. पीक विमा व कर्जासाठी शेतकर्‍यांना द्यायला जिल्हा बँकेकडे पैसे नाही. 1500 कोटी जिल्हा बँकेला शेतकर्‍यांना वाटप करायचे आहे. 210 कोटी जुन्या नोटा जिल्हा बँकेकडे पडून असून त्याचे 5 लाख व्याज शेतकर्‍यांना द्यावे लागत असल्याची माहिती किशोर पाटील यांनी दिली.

अफवेमुळे वसुलीवर परिणाम
राज्य शासन कर्जमाफी देेणार असल्याची अफवा आहे की सत्य; याबाबत बैठकीत आमदार किशोर पाटील यांनी पालकमंत्र्याना विचारणा केली. यामुळे जिल्हा बँकेच्या वसुलीवर परिणाम झाला आहे. शेतकरी कर्जमाफीच्या अपेक्षेने कर्ज फेडत नसल्याची व्यथा पालकमंत्री पाटील यांच्याकडे मांडली यावर पाटील यांनी सरकार कर्ज माफीच्या बाजूने असून लवकरच निर्णय घेणार आहे. मात्र शेतकर्‍यांनी कर्जाची परतफेड करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले पुन्हा कर्जमाफीचा मुद्दा आमदार किशोर पाटील यांनी उपस्थित केला असता मी एकटा येथे बसून निर्णय घेऊ शकत नाही असे पालकमंत्र्यानी सांगितले आमदार पाटील यांना उद्देशून आपणच राजकारणाचे भांडवल करण्यासाठी कर्जमाफीचा मुद्दा बनविला असल्याचा टोला शिवसेनेचे नाव न घेता लगावला.

कागदोपत्री कामे करून फसवणूक
अमळनेर तालुक्यात गेल्या वर्षी पाऊस कमी झाल्याने लोकांचे पाण्यासाठी हाल होत असून 12 पाण्याचे टँकर तालुक्यात सुरु आहे. खडकाळ जमीन असल्याने तालुक्यात पाण्याची कमतरता आहे. मातीचे परीक्षण करण्यात आले नसून खडकाळ जमिनीचा कोणताही पुरावा कृषी खात्याकडे नाही. कागदोपत्री घोडे अधिकार्‍यांकडून नाचविण्यात येत असल्याचा आरोप आमदार स्मिता वाघ यांनी केला . पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी तात्काळ संबंधित विभागाला कामात कसूर केल्यास कारवाईचा इशारा दिला आहे. अमळनेर तालुक्यातील शेतकर्‍यांचे प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याचे आदेश
पालकमंत्र्यांनी दिले.

780 गावांची हागणदारीमुक्ती नाही
जिल्ह्यात 780 गावे हागणदारीमुक्तीपासून वंचित आहे 2 लाख 617 गावामध्ये शौचालयाची कामे अपूर्ण असल्याची आकडेवारी पालकमंत्र्यांनी बैठकीत दिली . याबाबत जिल्हा परिषद अधिकार्‍यांनी लोक प्रतिसाद देत नसल्याचे कारण पुढे केले. यावर माजी मंत्री खडसे यांनी जनजागृती करण्यास प्रशासन कमी पडत असल्याचा आरोप अधिकार्‍यांवर केला . पालकमंत्र्यांनी तात्काळ मोहीम राबविण्याची ताकीद देत अंमलबजावणीचा अहवाल पुढच्या बैठकीत सादर करण्याचे सांगितले.