कर्जमाफीच्या मुद्यावर राज्यभर शेतकरी पेटला असून गेल्या एक जूनपासून शेतकरी संपावर गेला आहे. कर्जमाफीच्या मुद्द्यावर राज्यासह धुळे जिल्ह्यातही शेतकरी आक्रमक झाला आहे. जिल्ह्यातील विविध संघटनासह राजकीय पक्ष देखील आपण शेतकर्यांचे कैवारी असल्याचे दर्शन घडवत आहेत. काँग्रेस,राष्ट्रवादी बरोबर शिवसेनाही जोमात आंदोलन करत असल्याचे सर्वत्र जिल्ह्याभरात चित्र आहे. मात्र नुकत्याच झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत विरोधकांनी एक ओळीचा कर्जमाफीचा प्रस्ताव ठेवला असता, शिवसेनेचे मंत्री तथा जिल्ह्याचे पालक मंत्री ना दादा भुसे यांनी प्रस्ताव मान्यतेस नकार दिला. एकीकडे शेतकर्यांच्या न्याय हक्कासाठी शेतकर्यांच्या संपाला पाठिंबा देत आक्रमक पवित्रा घेणारी शिवसेना दुसरी कडे आपली सत्ता सही सलामत ठेऊन दिखावा करत असल्याचे सांगितले जात आहे. शेतकर्यांच्या न्याय हक्कासाठी लढा देणारी शिवसेना जिल्ह्यात अनेक ठिकाणी आंदोलन करत आहे. मात्र दुसरीकडे शेतकर्यांच्या कर्जमाफीसाठी शिवसेनाच नकार दर्शवित असल्याने शेतकर्यांच्या संवेदनशील विषयावर शिवसेनेची हि दुटप्पी भूमिका असल्याची चर्चा जिल्हाभर रंगत आहे.
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत काँग्रेसचे धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांनी कर्जमाफीचा एक ओळीचा ठराव करण्याची मागणी केली. परंतु कर्जमाफीचा मुद्दा मुख्यमंत्र्यांचा आहे आणि ते त्या विषयावर अभ्यास करत असल्याचे सांगून पालक मंत्र्यांनी ठरावाच्या प्रस्तावाला साफ नकार दर्शविला. त्यामुळे शिवसेनेने शेतकर्यांचा कैवारी होण्याचे सोंग घेतले असल्याची चर्चा विरोधकांमध्ये होत आहे. गेल्या अडीच तीन वर्षांपासून शिवसेना केंद्रात आणि राज्यातदेखील सत्तेत आहे. परंतु कोणत्याही मुद्यावर भाजप शिवसेना गेल्या अडीच,तीन वर्षात एकमत झाली नाही. शेतकरी कर्जमाफीच्या मुद्यावर तर शिवसेनेने पहिल्या दिवसापासूनच आक्रमक भूमिका घेतली आहे. सत्तेत राहून कर्जमाफीची मागणी वेळोवेळी शिवसेनेने केलेली आहे. बाहेरून पाठिंबा देवू, सत्तेतून बाहेर पडू परंतु शेतकरी कर्जमाफी झालीच पाहिजे ही भूमिका शिवसेनेने घेतलेली आहे. असे असले तरी एक प्रश्न महाराष्ट्रातून सर्वसामान्य नागरीकांकडून उपस्थित करण्यात आला की शिवसेनेची भूमिका कर्जमाफीबद्दल जर प्रामाणिक आहे तर मग शिवसेना सत्तेतून बाहेर का पडत नाही? परंतु हा प्रश्न अनुउत्तरीतच आहे. मात्र शेतकर्यांच्या कर्जमाफीच्या आठ दिवसाच्या आंदोलनात शिवसेना आघाडीवर उभी राहिलेली आहे. राज्यासह धुळे, शिंदखेडा,साक्री, तालुक्यात शिवसेनेने पेटून उठल्यागत आंदोलने सुरु ठेवली आहेत. भाजपाने शिवार संवाद यात्रा सुरू केल्यानंतर लगेच शिवसेनेने बांधावर कर्जमाफीचे अर्ज शेतकर्यांकडून भरून घेतले. या शिवसेनेच्या दुटप्पी भूमिकेमुळे भाजपामध्ये संतापाची लाट पसरली आहे. त्याचाच प्रत्येय काल झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दिसून आला. आ.गोटे आणि शिवसेनेच्या नेत्यांसह विरोधकांमध्ये कर्जमाफीच्या मुद्द्यावरून झालेल्या खंडाजगीने एकदा पुन्हा श्रेयाचा मुद्दा समोर आल्याचे चित्र स्पष्ट झाले. शिवसेनेचे माजी आमदार शरद पाटील हे शेतकर्यांच्या कर्ज माफीच्या मुद्द्यांवर तटस्थ भूमिका बजवित आहेत. तर दुसरीकडे शेतकर्यांना कर्ज माफिशिवाय शांत बसणार नाही अशी भूमिका काँग्रेसचे आ.कुणाल पाटील यांनी घेतली आहे. पाटील सध्या अनेक गावोगावी फिरून शेतकर्यांना आश्वासित करत आहेत. तर राष्ट्रवादिनेही शेतकर्यांसाठी कमर कसली आहे. हे सगळे चित्र पाहता उद्या शेतकर्यांना कर्जमाफी मिळाली तर त्यामागे आपलंच श्रेय सांगण्याची भूमिका या पक्षांची राहणार अशी चर्चा हि जोर धरू लागली आहे. शेतकर्यांच्या ह्या संवेदनशील विषयावर राजकारणी श्रेयाची पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न तर करत नाही ? असा देखील सवाल जनतेतून होत आहे.या सर्व पार्श्वभूमिवर सरकारने 31 ऑक्टोबरपर्यंत कर्जमाफीची घोषणा शेतकर्यांच्या भावनांवर मिठ चोळून केली. महाराष्ट्रात मध्यावधी निवडणूका डिसेंबर अखेर घोषित होणारच आणि कर्जमाफी सुद्धा शेतकर्यांना दिली जाणार. परंतु त्या कर्जमाफीचे श्रेय भाजपाला घ्यायचे असल्याने सर्व राजकारण सुरू आहे. मात्र या श्रेयाच्या राजकारणात शेतकर्यांचीच फरफट होताना दिसत आहे.
ज्ञानेश्वर थोरात, धुळे
9850486435