कर्जमाफीच्या रकमेसाठी राष्ट्रवादीचे राज्यव्यापी आंंदोलन

0

मुंबई । कर्जमाफीसाठी आतापर्यंत 51 लाख ऑनलाईन अर्ज आले आहेत. त्या अर्जांपैकी किती शेतकरी कर्जमाफीस पात्र आहेत त्यांची संख्या सरकारने येत्या एक ऑक्टोबरच्या आत जाहीर करावी. त्याचप्रमाणे पात्र शेतकर्‍यांच्या खात्यात एक ऑक्टोबरपूर्वी पैसे जमा करावेत. अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस राज्यात तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सोमवारी एका पत्रकार परिषदेत दिला.

हे सरकार पूर्णतः सत्तेत मशगूल झाले असून सरकारचे ना मुंबईकडे लक्ष आहे, ना अडचणीत असलेल्या शेतकर्‍यांकडे, ना राज्यातील गणेश भक्तांकडे… या सरकारने घोषणा तर भरसाठ केल्या. मात्र, कृतीमध्ये कोणतीच गोष्ट आणली नाही. गणपतीपूर्वी मुंबई-गोवा महामार्गाची दुरूस्ती केली जाईल असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. अद्याप या रस्त्याची दुरूस्ती झालेली नाही. गणेशोत्सवाच्या काळात तेथे मोठ्या प्रमाणात अपघात झाले आहेत. सरकारने गणेशभक्तांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे असा आरोपही त्यांनी केला.