मुंबई : राज्य सरकार कर्जमाफीच्या विरोधात नाही. पण कर्जमाफीमुळे प्रश्नही सुटत नाहीत, असे सांगतानाच शेतकर्यांना कायमचे कर्जाच्या बोजाखालून बाहेर काढण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. कर्जमाफीआधी ते पुन्हा कर्जच काढू नयेत, अशी स्थिती करायची आहे. त्यामुळे शेतकर्यांच्या कर्जमाफीची घोषणा योग्य वेळी करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या कार्यक्रमाच्या धर्तीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी मी मुख्यमंत्री बोलतोय हा कार्यक्रम सुरू केला. या कार्यक्रमाचे दर रविवारी आकाशवाणी व दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून प्रसारण केले जाणार आहे.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, उत्पादकतेच्या बाबतीत महाराष्ट्र हा इतर राज्यांच्या तुलनेत मागे आहे. राज्यातील शेती क्षेत्राचा उत्पादन खर्च जास्त आणि उत्पादन कमी आहे. यामध्ये बदल होणे आवश्यक आहे. शेती क्षेत्रातील गुंतवणूक वाढावी यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहोत. त्यासाठी आम्ही जागतिक बँकेकडे शेती क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी त्यांचे अर्थसहाय्य मिळावे म्हणून पहिल्यांदाच एक अभिनव प्रकल्प त्यांच्याकडे घेऊन गेलो. शेती क्षेत्रात गुंतवणूक झाल्यास नवीन प्रयोग व आधुनिक शेती करण्यास भरपूर वाव आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
शेती क्षेत्रात गुंतवणूक करणे गरजेचे आहे. कर्जमाफीमुळे आम्हाला राजकीय फायदा होईल. पण तसा निर्णय घेण्यापूर्वी शेतकरी स्वत:च्या पायावर उभा राहिला पाहिजे, असे सांगत कर्जमाफीच्या विरोधात नसल्याचेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. सरकार सामुहिक शेतीला प्रोत्साहन देत असून त्यांना जास्तीत जास्त सवलती व विविध योजना देण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले.
राज्य सरकारने भाज्या, फळांसाठी खुली बाजारपेठ उपलब्ध करून दिली आहे. शेतकर्यांसाठी महापालिकांना जागा उपलब्ध करून देण्यास सांगितले आहे. शेतकरी अशा ठिकाणी जाऊन आपल्या मालाची विक्री करू शकतो. चांगला माल व किफायतशीर दरात भाज्या व फळे मिळत असल्याने त्याला प्रतिसादही चांगला मिळत आहे. यामुळे दलालांची साखळीच संपुष्टात येईल असा विश्वास व्यक्त करतानाच नाशवंत पिकांना हमीभाव देणे कठीण असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.