अहमदनगर : अवघी दीड एकर शेती असलेल्या व काही तांत्रिक कारणांमुळे राज्य सरकारच्या शेतकरी कर्जमाफी योजनेत समावेश न झालेल्या शेतकर्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली. जामखेड तालुक्यातील कुसडगाव येथील शेतकरी धोंडीराम भानुदास शिरसाट (वय 42) या शेतकर्याने कर्जाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली.
शिरसाट यांची दीड एकर शेती आहे. त्यावर उपजीविका शक्य नसल्याने ते ऊस तोडणीचेही काम करतात. स्टेट बँकेकडून त्यांनी दीड लाखांचे कर्ज घेतले होते. त्याची परतफेड त्यांना करता आली नव्हती. राज्य सरकारच्या शेतकरी कर्जमाफीतही त्यांचा समावेश होऊ शकला नव्हता. त्यामुळे कर्जाचा डोंगर कायम होता. मधल्या काळात ते ऊस तोडणीसाठी गेले होते. पंधरा दिवसांपूर्वीच ते गावी परतले होते. पैशांची तजवीज करण्यासाठी बैलजोडी विकण्याची वेळ त्यांच्यावर आली. वसुलीसाठी बँकेच्या पूर्वीच नोटिसा आल्या होत्या. कर्जाची परतफेड करणे अशक्य वाटत असल्याने त्यांनी अखेर झाडाला गळफास लावून घेत आत्महत्या केली.