कर्जमाफीत फसवले!

0

पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन राज्यातील भाजप सरकारकडून शेतकर्‍यांची प्रतारणा करण्यात येत असून, कर्जमाफीच्या नावाखाली सरकारने शेतकर्‍यांची फसवणूक केली आहे. सरकार जरी 34 हजार कोटींची कर्जमाफी केल्याचे सांगत असले तरी, प्रत्यक्षात ही कर्जमाफी फक्त 5 हजार कोटी रुपयांचीच आहे. त्यामुळे सरकार देत असलेली कर्जमाफी फसवी आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

34 नव्हे फक्त 5 हजार कोटींची कर्जमाफी!
सावंत पुढे म्हणाले की, सरकारच्या खोट्या आकडेवारीच्या भूलभूलैयात अनेक शेतकर्‍यांच्या आशा-आकांक्षा भरडल्या जात आहेत. राज्यातील शेतकर्‍यांना 34 हजार कोटींची नाही तर प्रत्यक्षात फक्त 5 हजार कोटी रुपयांचीच कर्जमाफी मिळणार आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितलेल्या 89 लाख नाही तर फक्त 15 लाखांपेक्षाही कमी शेतकर्‍यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. मुख्यमंत्री 40 लाख शेतकर्‍यांचा सातबारा कोरा होणार आहे, असे सांगत असले तरी सरकारने लावलेल्या निकषामुळे फक्त 4.5 लाख शेतकर्‍यांचाच सातबारा कोरा होणार आहे. शिवाय, पुनर्गठन झालेल्या शेतकर्‍यांच्या सातबार्‍यावर कर्जाचा बोजा कायम राहणार आहे. 2012 च्या अगोदरच्या थकबाकीदरांना या कर्जमाफीतून वगळले आहे, अशी माहिती देऊन सावंत यांनी सरकारचा भंडाफोड केला.

सरसकट कर्जमाफी द्या..
राज्यातील कर्जमाफीचा हा भूलभूलैया काँग्रेसला मान्य नसून, राज्यातील सर्व शेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, या भूमिकेवर काँग्रेस ठाम आहे. राज्यातील सर्व सहकारी वित्त संस्थांनी शेतकर्‍यांना दामदुपटीने मुदलीपेक्षा अधिक व्याज लावू नये, असे राज्य शासनाचे परिपत्रक आहे. त्याची अंमलबजावणी तात्काळ करावी आणि अर्बन बँका, पतसंस्था आणि मायक्रोफायनान्सकडून कर्ज घेतलेल्या शेतकर्‍यांनाही कर्जमाफी द्यावी, अशी मागणी सावंत यांनी केली.