नाशिक । राज्यातील कर्जबाजारी शेतकर्यांच्या प्रश्न कमालिचा चिंतेचा बनल्यानंतर त्यांचे कर्ज माफ केले जावे अशा प्रकारची मागणी धोर धरु लागली, अखेरीस राज्य सरकारने शेतकर्याना सरसकट दीड लाखांपर्यंतची कर्जमाफी दिली आहे. मात्र या निर्णयानंतरही कर्जबाजारी शेतकरी आत्महत्या करीत असल्याचे भयानक वास्तव समोर आले आहे. चांदवड तालुक्यातील दह्याने येथील अशोक भवर याच्यासह अन्य दोघांनीही आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. अशोक भवर यांचे एकत्र कुटुंब असून ते कुटुंब प्रमुख होते. त्यांच्या नावे 3 लाख 30 हजार, भाऊ दह्याने येथे राहणार्या भरत भवर याच्या नावे एकूण 4 लाख 20 हजार तर आई ताराबाई भवर यांच्या नावे 3 लाख 57 हजार असे भवर कुटुंबियांवर एकूण 12 लाख 42 हजार रूपये सोसायटीचे कर्ज आहे. मात्र त्यांना कर्जमाफी निर्णयाचा लाभ मिळला नसल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे शासनाने केलेल्या कर्जमाफीच्या लाभापासून भवर कुटुंबियांना वंचित ठेवल्याने अशोक भवर यांनी आत्महत्या केल्याची चर्चा गावात सुरु आहे. याबाबत अधिक तपासाअंती सत्य उघड होईल, असे सांगितले जात आहे.
का होतात आत्महत्या?
कर्जमाफीचा निर्णय घेतला असला तरी कर्जमाफीच्या जाचक अटींमुळे कर्जमाफीपासून वंचित राहिल्याने नुकतेच नामपूर येथील भिकन सावंत या शेतकर्याने विहिरीत उडी घेऊन जीवनयात्रा संपवली होती. तर दिंडोरी तालुक्यातील सोनजांब येथील माधव जाधव या शेतकर्याने विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. तथापी कर्जबाजारी शेतकर्यांची आत्महत्या का थांबत नाही? हा प्रश्नही आता चर्चिला जात आहे. राज्य सरकारच्या सरसकट कर्जमाफीच्या निर्णयाचा लाभ राज्यातील तब्बल 36 लाख 10 हजार 216 शेतकर्यांना होणार आहे. या सर्व शेतकर्यांचा सातबारा पूर्णत: कोरा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सरकारने कर्जमाफीचा घेतलेला निर्णय व काही जणांचे सातबारा कोरा केले असल्याचा केला जाणारा दावा या पार्श्वभूमीवरही आत्महत्यांचे सत्र थांबत नसल्याचे ताज्या घटनांवरुन स्पष्ट होते.