कर्जमाफीनंतर आता शिवसेनेचे पडताळणी आंदोलन

0

मुंबई – सरकारमध्ये राहून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आंदोलन करणाऱ्या शिवसेनेने आता राज्य सरकारने आणि खास करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या कर्जमाफीची पडताळणी करण्यासाठी आंदोलन करण्याचे ठरवले आहे.

शिवसेना भवनात गुरूवारी झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हे आंदोलन जाहीर केले. या आंदोलनाचा एक भाग म्हणून येत्या सोमवारी, १० जुलैला सकाळी ११ वाजता शिवसेनेचे सर्व जिल्हाप्रमुख, आमदार, खासदार आपापल्या जिल्ह्यातल्या प्रमुख जिल्हा बँकांसमोर ढोल बजाओ आंदोलन करणार आहेत. जिल्हा बँकांनी प्रत्यक्ष लाभार्थी शेतकऱ्यांची यादी मागवू ती आपल्या सूचनाफलकावर ठळकपणे लावावी आणि त्या बँकेकडून किती शेतकरी कर्जमुक्त झाले हे जाहीर करावे, अशी मागणी यावेळी केली जाणार आहे. तसे निवेदन बँकांच्या अध्यक्षांना दिले जाणार आहे.

शिवसेनेच्या ग्राहक संरक्षण कक्षाच्या पदाधिकाऱ्यांनाही प्रत्येक जिल्हा बँकेत जाऊन लाभार्थी शेतकऱ्यांची यादी मिळवण्याच्या सूचनाही ठाकरे यांनी दिल्या आहेत. शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे पदाधिकारी जिल्हा बँकांच्या बाहेर टेबल-खुर्ची टाकून शेतकऱ्यांना मदत करणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ किती शेतकऱ्यांना होतो, याचा आढावा घेत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली कर्जमाफी कशी फसवी आहे, हे दाखवून देण्याचा प्रयत्न यानिमित्ताने शिवसेना करणार असल्याचे बोलले जाते.