कर्जमाफीनंतर शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबतील हे लेखी द्या !

0

शिर्डी : शेतकर्‍यांना कर्जमाफी मिळावी यासाठी विरोधी पक्षासह सरकारमधील मित्रपक्षानेही भाजप सरकारविरोधात रान उठवले असतानाच, भाजपचे प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी कर्ज माफ करून शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबत असतील, तर यासाठी सर्व विरोधकांनी एकत्र यावं, राजकीय जोडे बाहेर काढावे, आणि या राज्यामध्ये शेतकरी आत्महत्या करणार नाहीत, अशाप्रकारचा ठोस प्रस्ताव द्यावा, मग त्यावर सरकार विचार करेल असे अजब वक्तव्य शिर्डीत केले आहे. दानवेंच्या वक्तव्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

रावसाहेब दानवे सोमवारी शिर्डीत साईबाबांच्या दर्शनाला आले होते. त्यावेळी त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं. विरोधकांकडून आमच्यावर काय आरोप होत आहेत, याची आम्हाला चिंता नाही. आमचं लक्ष पायाभूत सुविधांवर आहे, असंही दानवे म्हणाले. राज्यातील शेतकर्‍यांच्या वाढत्या आत्महत्या आणि शेतकर्‍यांना कर्जमाफी मिळावी यावरून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राज्यभर संघर्ष यात्रा काढून सरकारला जेरीस आणले आहे. नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही विरोधकांनी सरकारला धारेवर धरले होते. विरोधकांच्या आक्रमक भूमिकेनंतर आता शेतकर्‍यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी सरकारमधील सहकारी पक्ष असलेली शिवसेना आणि स्वाभिमान शेतकरी संघटना रस्त्यावर उतरली आहे. शिवसेनेने मराठवाड्यात शिवसंपर्क अभियान राबवून शेतकर्‍यांशी संवाद साधला. पावसाळ्यापूर्वी शेतकर्‍यांना कर्जमुक्ती मिळाली नाही तर सरकारविरोधात लढा अटळ आहे असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्याच्या दौर्‍यात सरकारला दिला आहे. तर स्वाभिमान शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनीही शेतकर्‍यांच्या कर्जमाफीची मागणीवर आंदोलन छेडले आहे. सरकारमधील मित्र पक्ष शेतकर्‍यांच्या कर्जमाफीच्या बाजूने असतानाच दानवेंच्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

शेतकर्‍यांविषयी असे वक्तव्य करणार्‍या दानवेंनी जनाची नाही मनाची लाज बाळगावी. सत्तेवर आल्यानंतर दानवेंची भाषा बदलली आहे. शेतकर्‍यांविषयीचा कळवळा आता कुठे गेला?
– धनंजय मुंडे, विरोधी पक्षनेता, विधान परिषद