कर्जमाफीबाबत केंद्रसरकार सकारात्मक

0

राज्यसरकार बोजा उचलण्यास तयार

मुंबई : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राज्य सरकारच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाने केंद्रसरकारशी चर्चा केली असून याबाबत सरकार सकारात्मक आहे, तसेच राज्य सरकार देखील हिस्सा उचलण्यास तयार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. अर्थसंकल्पाच्या आधी केलेल्या निवेदनाच्या वेळी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, अर्थमंत्री आणि केंद्रीय कृषीमंत्र्यांशी कर्जमाफीबाबत चर्चा केली असून केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहायला सकारात्मक आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी जी योजना तयार करेल, त्यातील आर्थिक हिस्सा आम्ही उचलायला तयार आहोत. मात्र, हा निर्णय एका दिवसात होणार नसून, त्यासाठी व्यवस्था उभी करावी लागेल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत सरकार सकारात्मक आहे. मात्र, जे 70 टक्के शेतकरी नियमित कर्ज भरतात, त्यांचा विचार करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील 20 जिल्ह्यांमध्ये 70 टक्केच्या वर शेतकरी नियमित कर्ज भरणा करत आहेत. त्यांच्या मनात असं नको यायला की कर्ज थकीत ठेवल्यावर माफी मिळते. मग आम्ही पण कर्ज थकीत ठेवतो. असे झाल्यास बँकिंग व्यवस्था कोलमडण्याची भीती मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

मुख्यमंत्री म्हणाले, आज 31 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी 30, 500 कोटी रुपयांची आवश्यकता आहे. शेतकरी कर्जबाजारी होणारच नाही, यासाठी प्रयत्न करावे लागतील, असे मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले. शिवाय, अर्थमंत्री आज जे बजेट सादर करतील, ते शेतकऱ्यांसाठीच असेल, असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले. यावेळी सुरु असलेल्या गोंधळावरून मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर देखील टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, ह्यांच्या वर्तनावरूनच लक्षात येतेय की यांना शेतकऱ्यांप्रति किती कणव आहे. विरोधक केवळ राजकारण करत असल्याचेही फडणवीस यावेळी म्हणाले. केवळ घोषणा देऊन शेतकऱ्यांचा कैवारी बनू शकत नाहीत, असा टोलाही त्यांनी लगावला.