धरणगांव । शेतकरी कर्ज माफी झाली पाहिज, शेतकर्यांना कृषी पंपासाठी 24 तास वीज मिळावी, शेतकर्यांच्या शेती मालाला हमी भाव मिळावा, कापसाला 7 हजार भाव मिळावा, वृध्द शेतकर्यांना आणि भूमी हीन शेत मजुराला पेन्शन योजना लागू करावी, शेतकर्यांचा कृषी पंपाचे बील संपूर्ण माफ करण्यात यावी, अंजनी धरण्याचा कालव्याचे उर्वरीत काम त्वरीत पूर्ण करण्यात यावे, बालकवी ठोंबरे स्मारक निधी लवकर मिळावा, धरणगांव शहरातील बहु प्रतिक्षित फिल्टर प्लान काम लवकर पूर्ण करण्यात यावे या मागण्यासह उर्वरीत सतरा मागण्यासाठी धरगाव येथे राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीतर्फे माजीमंत्री गुलाबराव देवकर यांचा नेतृत्वाखाली शनिवार 20 रोजी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मागणीचे निवेदन तहसिलदार कैलास कडलग यांना देण्यात आले.
सहकार राज्यमंत्री असमर्थ
सध्या सहकार राज्यमंत्री असलेले जिल्ह्याचे नेते गुलाबराव पाटील हे विरोधात असतांना शेतकर्यांच्या प्रश्नासाठी आग्रही असल्याचे दिसत होते. मात्र सत्तेत आल्यापासून शेतकर्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी ते असमर्थ असल्यासचे दिसते. आंदोलनकर्त्यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर टिका केली. गुलाबराव पाटील यांनी जळगांव ग्रामीणचा विकास न करता मतदारसंघ भकास केला असून पाणी प्रश्न, रस्ते, आरोग्य, याविषयी कुठलेही नियोजन नसल्याची टीका त्यांच्यावर करण्यात आली.
शासनाचा धिक्कार
धरणगांव येथे शेतकर्यांचा न्याय मागण्यासंदर्भात राष्ट्रवादीतर्फे संघर्ष मोर्चा काढण्यात आला. दिवसेंदिवस शेतकर्यांची आत्महत्या वाढत असून असंवेदनशिल सरकार शेतकर्यांची थट्टा करत आहे. शेतकर्यांचा कष्ट कर्यांचा बळीराजाला आत्महत्या करण्यास भाग पाडणार्या या शासनाचा धिकार असल्याची घोषणा यावेळी आंदोलनकर्त्यांनी केले. उन्हाची तिव्रता असतांना आंदोलनकर्त्यांनी पायी चालत सरकार विषयी आपल्या तिव्र नाराजीचा भावना व्यक्त केली.
यांची होती उपस्थिती
कोट बाजार, परिहार चौक, शिवाजी पुतळा या मार्गाने थेट तहसील कार्यालयावर शेतकर्यांचा संर्घष मोर्चा धडकला. यावेळी राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष आमदार सतिष पाटील, गफ्फार मलिक, माजी आमदार हरीभाऊ महाजन, रमेश पाटील, एन.बी.पाटील, माजी नगरसेवक व माजी गटनेता दिपक वाघमारे आदी उपस्थित होते. संघर्ष मोर्चात जळगाव ग्रामीण मतदार संघाचे शेतकर्यांचा समावेश होता. मोर्चात सहभागींची संख्या अधिक असल्याने वाहतूकीस काही काळ अडचण निर्माण झाली होती. शांततेच्या मार्गाने मोर्चा काढण्यात आला.