मुंबई । राज्यातील निरनिराळ्या शेतकरी संघटनांशी कर्जमाफीसह विविध मागण्यांसंदर्भात चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्त्वात एका उच्चाधिकार मंत्रिगटाची नियुक्ती केली आहे. मुख्यमंत्र्यांनी उचललेल्या या पावलाचे सुकाणू समितीने स्वागत केले असून चर्चेला तयारी दाखवली आहे. त्यामुळे शेतकरी आंदोलनाचा तीढा सुटण्याची शक्यता निर्माण झआली आहे.
राज्याचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, सहकारमंत्री सुभाष देशमुख, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते हे या उच्चाधिकार मंत्रिगटाचे सदस्य असतील. हा उच्चाधिकार मंत्रिगट सर्व शेतकरी नेत्यांशी चर्चा करेल आणि या सर्व मागण्यासंदर्भात आपला प्रस्ताव निर्णयार्थ शासनाकडे सादर करेल, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. कोणतेही प्रश्न हे चर्चेतूनच सोडविले जात असतात आणि शेतकर्यांच्या सर्व प्रश्नावर शेतकरी नेत्यांशी चर्चा करण्याची शासनाची तयारी आहे, याचा पुनरूच्चार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार केला आहे. त्यानुषंगाने या उच्चाधिकार मंत्रिगटाची नियुक्ती करण्यात येत आहे. शेतकरी नेत्यांनी सुद्धा चर्चेतून मार्ग काढावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
हमीभाव ऐकून त्याने प्राण सोडले
लसणाला अवघा 4 रूपये हमीभाव मिळाल्याचे ऐकताच शेतकर्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. राजस्थानच्या कोटामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. सत्यनारायण मीना हा 32 वर्षांचा शेतकरी कोटाच्या बाजारसमितीत शेतात पिकवलेला लसूण घेऊन आला होता. मात्र अवघा 4 रूपये हमीभाव मिळाल्याचे त्याने ऐकले आणि तो जागीच कोसळला. राजस्थानच्या रोईन या गावात सत्यनारायण वास्तव्यास होता आणि तिथेच त्याची शेतीही होती. तो जेव्हा जागेवरच कोसळला तेव्हा त्याला तातडीने कोटामधल्या सरकारी दवाखान्यात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिथेच त्याला मृत घोषित केले.
मुख्यमंत्र्यांचे दौरे रद्द
मुख्यमंत्र्यांनी राज्यातील आपले सर्व दौरे रद्द केले आहेत. अहमदनगरपाठोपाठ जळगावचाही नियोजित दौरा रद्द केलाय. खरे तर या दोन्ही दौर्यांसाठी प्रशासनाकडून भूरपूर तयारी देखील करण्यात आली होती. काल रात्रीपर्यंत जळगाव दौर्याची तयारी सुरू होती. पण काल नाशिकमध्ये सुकाणू समितीने मंत्र्यांना गावबंदीचा इशारा दिला आणि मुख्यमंत्र्यांचे हे दोन्ही नियोजित दौरे रद्द करण्यात आलेत. मध्यंतरी अमरावतीतही काँग्रेस कार्यकर्त्यांनी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवर यांची गाडी अडवली होती. त्यांच्यावर कांदे फेकले होते. थोडक्यात सरकारने शेतकरी संपवाल्यांचा चांगलाच धसका घेतल्याचे दिसून येते आहे.
उस्मानाबादमध्ये गळफास घेऊन आत्महत्या
स्वामीनाथ आयोगाच्या शिफारशी लागू केल्यास आम्ही आत्महत्या करणार नाही. असे हमीपत्र लिहिणार्या खामसवाडीतील तरुण शेतकर्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. शुक्रवार पहाटे ही घटना समोर आली. संदिप बलभीम शेळके (वय 22) असे या तरुणाचे नाव असून गुरुवारी जूनच्या मध्यरात्री शेतातील लिंबाच्या झाडास गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली. संदिपच्या वडिलांच्या नावार 1 हेक्टर 3 आर शेती असून 2 लाख 50 हजार रुपयांचे कर्ज आहे. संदीपचा मोठा भाऊ पायाने अपंग आहे.
हमीपत्राची विशेष मोहीम
शेतीमालास योग्य भाव मिळावा आणि कर्जमाफी करावी, यासाठी शेतकर्यांनी पुकारलेला संपाला आता वेगळे वळण मिळाल्याचे पाहायला मिळत आहे. तुर्तास शेतकर्यांनी संप मागे घेतला असून सरकारविरोधातील आंदोलन कायम राहणार असल्याची भूमिका शेतकर्यांनी गुरुवारी स्पष्ट केली आहे. दरम्यान, संपाला सुरुवात झाल्यानंतर उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकर्यांनी आत्महत्या करणार नाही, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हमीपत्र देण्यासाठी विशेष मोहिम राबवली होती.
मुख्यमंत्र्यांसाठी तब्बल एक किलो मीटर लांबीचे पत्र
सरकारने स्वामीनाथन समितीच्या शिफारशी मान्य केल्या तर शेतकरी आत्महत्या करणार नाही, अशी हमी देण्यासाठी खामसवाडीतील शेतकर्यांनी मुख्यमंत्र्यांसाठी तब्बल एक किलो मीटर लांबीचे पत्रच लिहिले. यावर अनेक ग्रामस्थांच्या स्वाक्षर्याही घेतल्या. पोस्टामार्फत दोन दिवसांत ते तहसील कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून हे पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात येणार होते. मात्र, हे हमीपत्र मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचण्याच्या आतच तरुण शेतकर्याने आत्महत्या केली. राज्यातील शेतकरी संघटनांनी संप मागे घेण्याची घोषणा केली असली तरी सरकारला त्यांनी दोन दिवसांचा अल्टिमेट दिला आहे. दोन दिवसांत सरकारने शेतकर्यांच्या प्रश्नावर ठोस भूमिका घेतली नाही, तर पुन्हा रस्त्यावर उतरुन तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकर्यांनी दिला आहे.