मुंबई । दिवसेंदिवस राज्यातील शेती मालाला भाव मिळत नसल्याने अनेक पालेभाज्या, जीवनाश्यक वस्तूंचे दर कोसळत आहेत. त्यातच शेतकर्यांच्या मुला-मुलींकडून लग्नाच्या खर्चासाठी पैसे नसल्याने आत्महत्या करण्यात येत असल्याने शेतकऱी आणि शेतकर्यांच्या कुटुंबियांना वाचविण्यासाठी कर्जमाफी जाहीर केली पाहीजे यामागणी करीता काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची भेट घेतली. तसेच त्याकरीता विधिमंडळाचे विशेष अधिवेशन घ्यावे अशी मागणीही त्यांनी यावेळी राज्यपालांकडे केली.
शेतकर्यांना बोनस आणि वीजबीलमाफी द्या
शेतकर्यांना कर्जमाफी द्यावी याकरिता विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवावे या मागणीसाठी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेड-पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार वर्षा गायकवाड, यशोमती ठाकूर, अमिता चव्हाण, नितेश राणे यांच्यासह विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार जयंत पाटील, प्रकाश गजभिये यांच्यासह अन्य नेत्यांचा या शिष्टमंडळात समावेश होता. या शिष्टमंडळाने मलबार येथील राजभवन येथे जावून राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची भेट घेतली. तूर उत्पादक शेतकर्यांना बोनस द्यावा, तसेच कृषीपंपाचे वीजबील माफ करावे, अशी मागणीही त्यांनी राज्यपालांकडे केली.
शिवसेनेचे मांजर झाले
सद्यपरिस्थितीत शेतकर्यांची अवस्था बिकट असून त्यांना कर्जमाफी जाहीर करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. त्यामुळे राज्य सरकारने त्यासाठी एक दिवसीय विधिमंडळाचे खास अधिवेशन बोलवावे अशी मागणी करत त्यात ठराव मांडावा त्यास सर्व विरोधी पक्षांकडून एकमुखी पाठिंबा दिला जाईल असे आश्वासन विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिले. यावेळी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही राज्य सरकारवर टीकेची झोड उठवित शिवसेनेचा मांजर झाल्याची टीका केला.