कर्जमाफीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत करा!

0

वाढदिवसानिमित्त आमदार किसन कथोरे यांचे आवाहन

मुरबाड । राज्यातील सर्व शेतकर्‍यांना कर्ज मुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री साहाय्यता निधीस मदत करण्याचे आव्हाहन आमदार किसन कथोरे यांनी केले आहे. येत्या १९ सप्टेंबर २०१७ रोजी आमदार कथोरे यांचा वाढदिवस आहे. या निमित्ताने आमदार कथोरे यांनी सर्व हितचिंतकांनी वाढदिवसाला मुख्यमंत्री सहाय्यता निधीस धनादेश आणावे किंवा शालेय साहित्य आणावे तसेच भेटवस्तू अथवा बुके आणू नये असे आवाहन केले आहे.

आमदार कथोरे यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी संपूर्ण ठाणे जिल्ह्यातून तसेच मुरबाड मतदार संघातून असंख्य हितचिंतक येत असतात. मात्र काही वर्षांपूर्वी त्यांनी पुष्पगुछ,भेटवस्तू न स्वीकारण्याचा निर्णय घेतला होता. बुके ऐवजी बुक देण्याचे आवाहन केले होते. त्याचा उपयोग मुरबाड मतदार संघातील सर्व आदिवासी पाड्यातील गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी करण्यात आला होता. तसेच दोन वर्षांपूर्वी दुष्काळाची परिस्थिती होती तेंव्हादेखील आमदार किसान कथोरे यांनी वाढदिवस साजरा न करता मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत करण्याचे आव्हाहन केले होते त्या वर्षी जवळपास २६ लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीस जमा करण्यात आले होते.