नवी दिल्ली । शिवसेनेच्या नेत्यांनी सोमवारी नवी दिल्ली येथे केंद्रीय मंत्रिमंडळातील नेत्यांची भेट घेऊन कर्जमाफीबाबत चर्चा केली. शिवसेनेच्या या शिष्टमंडळामध्ये दिवाकर रावते, विनायक राऊत आणि अरविंद सावंत यांचा समावेश होता.
राज्यातील अर्थसंकल्प सादर करण्याच्या एक दिवस आधी मुख्यमंत्र्यांसह शिवसेनेच्या नेत्यांनी अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेऊन शेतकर्यांच्या कर्जमाफीसाठी केंद्राने मदत करण्याची मागणी केली होती. त्याला जेटली यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचेही सांगितले होते. अर्थसंकल्पात शेतकर्यांसाठी मजबूत तरतूद असेल, या अपेक्षेने शिवसेनेने अर्थसंकल्प सादर करताना विरोध न करण्याचा निर्णयही घेतला होता. पण राज्य सरकारकडून शेतकर्यांच्या कर्जमाफीसंदर्भात काहीही ठोस पावले उचलली गेले नसल्याचे लक्षात आल्यावर शिवसेनेने स्वतःच त्यासाठी प्रयत्न केले असल्याचे म्हटले आहे. शिवसेना नेते दिवाकर रावते, विनायक राऊत आणि अरविंद सावंत यांनी सोमवारी नवी दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली. राजनाथ सिंह यांच्याबरोबर महाराष्ट्रातील शेतकर्यांची स्थिती मांडून त्यांच्या कर्जमाफीसाठी मदत करण्याची मागणी केली. तसेच संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू यांचीदेखील शिवसेना नेत्यांनी भेट घेतली असल्याची माहिती आहे.