पुणे । छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून शेतकर्यांना दिड लाखापर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. त्यासाठी आपले सरकार सेवा केंद्रातून ग्रामीण भागातील शेतकर्यांची नोंदणी करण्यात येणार असून आधार कार्डची माहिती अद्ययावत केली जाणार आहे.
राज्यातील शेतकर्यांना दीड लाख रुपयापर्यंतचे कर्ज माफ करण्याचा निर्णय सरकारने जाहीर केला. त्या निर्णयाची अंमलबजावणी सध्या करण्यात येत आहे. कर्जमाफीसाठी शेतकर्यांनी ऑनलाइन अर्ज भरणे आवश्यक आहे. आपले सरकार सेवा केंद्राद्वारे बायोमॅट्रीक नोंदणी करण्यात येणार आहे.
ग्रामपंचायतींना ’बायोमेट्रिक डिव्हाईस’
जिल्ह्यात 1407 ग्रामपंचायती आहेत. नोंदणीसाठी 550 ग्रामपंचायतींना ’बायोमेट्रिक डिव्हाईस’ देण्यात आले आहे. उर्वरीत आणखी 250 हून ग्रामपंचायतींना डिव्हाईस लवकरच देण्यात येणार आहे. कर्जमाफीसाठी नाव नोंदविण्यासाठी शेतकर्यांना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आवाहन करण्यात येणार आहे. या संदर्भात या विभागाच्यावतीने जिल्ह्यात मोहीम राबविण्यात येणार आहे. आपले सरकार सेवा केंद्राद्वारे शेतकर्यांच्या बँकेच्या खात्यासह सविस्तर माहिती घेऊन अर्ज भरण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
आधार कार्ड काढण्याची सुविधा
कर्जमाफीसाठी अर्ज भरताना आधारची माहिती ही घेण्यात येणार आहे. ज्या शेतकर्यांनी आधारची नोंदणी केली नसेल त्यांना आधार कार्ड काढून देण्याची सुविधा देखील उपलब्ध करण्यात येणार आहे. राज्यात 27 हजार ’महा ई सेवा’ केंद्र असून पुणे जिल्ह्यात 880 केंद्र आहेत. त्या केंद्रामध्ये शेतकर्यांच्या आधारची माहिती लिंक करण्यासाठी ’बायोमेट्रिक डिव्हाइस’ ग्रामपंचायतीना उपलब्ध करून देण्यात येणार आहे