कर्जमाफीसाठी शेतकर्‍यांना आधार जोडणी आवश्यक

0

मुंबई । शेतकरी कर्जमाफीचे लाभ घेण्यासाठी आधार जोडणी न केलेल्या शेतकर्‍यांनी लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करावी असे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले आहे. मंत्रीमंडळ उपसमितीच्या बैठकीत शेतकरी कर्जमाफी योजनेचा राज्यभरातील आढावा घेतल्यानंतर त्यांनी जनशक्तिशी बोलताना ही माहिती दिली. यावेळी देशमुख म्हणाले की, कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज केलेल्या शेतकर्‍यांच्या छाननीचे काम सध्या सुरु आहे. छाननीची प्रक्रिया युद्ध पातळीवर सुरु आहे. यात राज्यातील 2 लाख 41 हजार 628 शेतकर्‍यांचे अर्ज आधारशी जोडलेले नसल्याचे आढळून आले आहे. त्यापैकी काही शेतकर्‍यांकडे आधारकार्डच नसल्याचे दिसून आले आहे.

तालुका पातळीवर तक्रार निवारण केंद्र
देशमुख यांनी सांगितले की, आधार जोडणी नसल्यामुळे अशा शेतकर्‍यांना कर्जमाफीचे लाभ नाकारणे योग्य होणार नाही अशी चर्चा यावेळी झाली. त्यामुळे हे शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्यात येणार आहे. त्यासाठी ज्यांच्याकडे आधारकार्ड आहेत अशा शेतकर्‍यांनी तालुका पातळीवरील तक्रार निवारण केंद्रात जाऊन कर्जमाफीच्या अर्जाशी आधारची जोडणी करुन घ्यावी. ज्यांच्याकडे आधार नसेल अशा शेतकर्‍यांनी आधारकार्ड नव्याने काढून त्याची नोंदणी अर्जासोबत करणे आवश्यक आहे. त्यांनीही प्रक्रिया पूर्ण करावी आणि त्यानंतर त्यांनाही कर्जमाफीचे लाभ दिले जातील, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला. त्यासाठी कोणतीही मुदत देण्यात आलेली नाही मात्र शेतकर्‍यांनी लवकरात लवकर ही जोडणी करुन घेणे गरजेचे आहे, असे सुभाष देशमुख म्हणाले.

सहकार विभाग तत्पर
शेतकर्‍यांकडून ऑनलाईन अर्जासोबत सहकार खाते बँकांकडूनही माहिती घेत आहे. हा 66 कॉलमचा अर्ज भरुन देण्याचे बँकांवर बंधन आहे. राज्यातील जिल्हा, राष्ट्रीयकृत आणि व्यापारी अशा मिळून 89 बँका शेतकर्‍यांना कर्ज पुरवठा करतात. मात्र, अनेक बँकांनीही अजूनही माहिती सादर केलेली नाही. राष्ट्रीयकृत आणि व्यापारी बँका माहिती सादर करण्यात आघाडीवर आहेत. जिल्हा बँकांकडून माहिती मिळण्यात विलंब होत आहे. माहिती अभावी कर्जमाफीची प्रक्रिया रखडू शकते, त्यामुळे सहकार खाते तत्पर भूमिकेत आहे.