कर्जमाफीची अमलबजावणी प्रत्यक्षात उतरणार, 23 पासून अर्जाची पडताळणी
मुंबई । महाराष्ट्र सरकारच्या ऐतिहासिक कर्जमाफीची अमलबजावणी प्रत्यक्षरीत्या पुढील 15 ऑक्टोबरपासून होणार आहे. ऑनलाईन अर्जांची पडताळणी पूर्ण झालेल्या शेतकर्यांच्या कर्ज असलेल्या बँक खात्यात 15 ऑक्टोबरपासून कर्जमाफीची रक्कम वर्ग करण्यास सुरुवात होणार असल्याची माहिती राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी जनशक्तिशी बोलताना दिली. 15 ऑक्टोबरपासून टप्याटप्याने कर्जमाफीची प्रत्यक्ष अमलबजावणी सुरू होईल असा विश्वास कृषिमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. संपूर्ण कर्जमाफ झालेल्या शेतकर्यांना कर्जमाफी झाल्याचे प्रमाणपत्र देखील संबंधित बँकांद्वारे दिले जाणार असल्याचे फुंडकर यावेळी म्हणाले.
खात्यावर रक्कम होणार वर्ग
कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर 15 सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याचे शासनाकडून सांगितले होते. मात्र ऑनलाइन अर्ज करताना येणार्या अडचणी व राज्यभरातून होत असलेली मागणी लक्षात घेऊन ही अवधी 22 सप्टेंबरपर्यंत वाढवून देण्यात आली आहे. 22 सप्टेंबरनंतर ऑनलाइन अर्जाची छाननी व बँकांकडून सर्व माहिती गोळा करून 15 ऑक्टोबरपासून शेतकर्यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा केली जाणार असल्याचे कृषिमंत्री फुंडकर यांनी सांगितले. दीड लाखाच्या आतील थकबाकीची रक्कम पूर्णपणे माफ होणार आहे. शेतकर्यांची संपूर्ण कर्जमाफी केली जाणार असून या शेतकर्यांच्या कर्ज असलेल्या खात्यावर रक्कम जमा होऊन ती रक्कम बँकांकडे वर्ग होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
चावडी वाचन करणार?
कर्जमाफीच्या अर्जाची छाननी झाल्यानंतर कर्जमाफीतल्या लाभार्थी शेतकर्यांच्या नावाच्या सूचीचे चावडी वाचन करण्याबाबत मंत्रीगटाच्या उपसमितीच्या बैठकीत जोरदार चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. चावडी वाचन करण्याला काही मंत्र्यांनी विरोध दर्शविला असल्याचे सूत्रांकडून समजते. चावडी वाचन केल्याने बोगस शेतकरी समजण्यास मदत होईल असे काही मंत्र्यांचे म्हणणे आहे.
22 सप्टेंबरला ऑनलाइन अर्जाची मुदत संपल्यानंतर आलेल्या अर्जाची पडताळणी व सर्व बँकांकडून आलेल्या माहितीच्या आधारावर 15 ऑक्टोबरपर्यंत शेतकर्यांच्या कर्ज खात्यावर पैसे जमा करण्याची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू होईल.
-पांडुरंग फुंडकर, कृषिमंत्री