कर्जमाफी अर्जास तांत्रिक अडचण

0

जरंडी । शेतकर्‍यांचे कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी गुरुवारी 1 सप्टेंबर सलग पाचव्या दिवशीही पोर्टल बंद झाल्याने सोयगावला शेतकर्‍यांची मोठी कोंडी झाली होती.त्यामुळे सर्वर सुरु होण्याच्या प्रतीक्षेत सेवा केंद्रावरच वामकुक्षी केल्याचा प्रकार 1 सप्टेंबर पासून दिसून आल्याने बंद पोर्टल अभावी शेतकरी हवालदिल झाले होते. सोयगावसह तालुक्यात कर्जमाफीचे अर्ज भरण्याचा गोंधळ चौथ्या दिवशीही सुरूच असल्याने सर्वर बंदमुळे शेतकर्‍यांना सेवा केंद्रावरून रिकाम्या हाताने परत जाण्याची वेळ येत आहे.

वृद्ध शेतकर्‍यांच्या अडचणी वाढल्या
या प्रक्रियेसाठी यु.आय.डी सर्वरवर पती पत्नीचे अंगठ्यांची जुळवणी झाली तरच अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येते परंतु वाढलेल्या वयाच्या हिशोबाने काही वृद्ध शेतकर्‍यांचे अंगठे जुळत नसल्याने या शेतकर्‍यांना अंगठे अद्यावत करण्याचे नव्याने काम वाढल्याने यासाठी पुन्हा नवीन खर्च येत असतो, त्यामुळे कर्जमाफीची ओनलाईन प्रक्रिया शेतकर्‍यांच्या मानगुटीवर बसली आहे.

जातीच्या प्रवर्गाचा उल्लेख
दरम्यान शासनाने जिल्हा बँकेच्या थकबाकीदार शेतकर्‍यांना संबंधित अर्जावर जातीच्या प्रवर्गाचा उल्लेख नव्याने काढल्याने गुरुवारी 31 ऑगस्ट संबंधित तलाठ्याला शोधण्यासाठी थकबाकीदार असलेल्या पात्र शेतकर्‍यांची ऐनवेळी त्रेधातिरपट उडाली होती. कर्जमाफीच्या अर्जावर जातीच्या प्रवर्गाचा उल्लेख कशासाठी अशी चर्चाही शेतकर्‍यांमध्ये रंगली होती. दरम्यान यु.आय.डी. सर्वर सकाळी नऊ वाजेपासूनच बंद झाल्याने तालुक्याची कर्जमाफीची अर्ज भरण्याची प्रक्रिया ठप्प झाली होती. त्यामुळे यामध्ये संपूर्ण तालुक्यातच गोंधळ उडाल्याने सोयगावला शेतकरी दिशाहीन झाले होते. ऐन खरिप पिकांच्या काढणीच्या वेळी ही प्रक्रिया आल्याने शेतकर्‍यांना खरीपाची काढणी थांबवून कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी धावपळ करावी लागत आहे.

कर्जमाफीच्या अर्जासाठी जातीचा प्रवर्ग मागण्याच्या माहितीचे संकलन सुरु आहे.जिल्हा बँकेच्या थकबाकीदार शेतकर्यांचीच जात अर्जावर मागण्यात येत आहे.याबाबतीत जिल्हा बँकेकडून खुलासा मागविण्यात आला आहे,संबंधित सेवा संस्थेचे सचिव कर्जमाफीच्या अर्ज भरण्यासाठी आलेल्या शेतकर्‍यांकडून स्वतंत्र संचिका भरून घेत असल्याची माहिती उपलब्ध आहे.
– छाया पवार, तहसीलदार सोयगाव

तालुक्यातील सेवा संस्था अपडेट करण्याचे काम शासन पातळीवर हाती घेण्यात आले आहे.त्यासाठी कर्जदार शेतकर्याची संपूर्ण माहितीसह डाटाच फीड करण्यात येत असल्याने जातीच्या प्रवर्गाची गरज भासत आहे.त्यातच थकबाकीदार शेतकरी तोच असल्याचे या बाबींवरून निष्पन्न होण्यास मदत होते.
-भावूसाहेब मरमट,
सहायक अधिकारी निबंधक कार्यालय,