सोयगाव। सोयगावला गेल्या आठवडाभरापासून शासनाच्या वतीने करण्यात आलेल्या कर्जमाफीची घोषणा आणि खरीप पिकांच्या पिकविम्यासाठी मोठी लगभग सुरु असतांना, शेतकर्यांना शासनाच्या कोणत्याच निर्णयात यश येत नसल्याने शेतकर्यांचा आठवडा वाया गेला आहे. त्यामुळे बुधवारी 2 ऑगस्टपासून हताश झालेल्या शेतकर्यांनी शासनाच्या झालेल्या घोषणांचा नाद सोडण्याचा निर्णय सोयगावला घेतला आहे. थकबाकीदार कर्जदार शेतकर्यांसाठी शासनाने कर्जमाफीचा निर्णय घेतला आहे. परंतु अद्याप या निर्णयाची अंमलबजवणी शासकीय निकषातच अडकली असतांना, पात्र शेतकर्यांना कर्जमाफीचे अर्ज भरण्याच्या सूचना शासनस्तरावर करण्यात आलेल्या आहे.
गोंधळामुळे आठवडा गेला वाया
अर्ज भरण्याच्या सुचना मिळाल्या असल्या तरी परंतु संबंधित अर्ज भरण्याचे संकेतस्थळ अद्यापही सुरु न झाल्याने कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी शेतकर्यांची ऑनलाईन धावपळ उडाली आहे. त्यामुळे संकेतस्थळाअभावी त्या योजनेचा शुभारंभ करण्यात आलेला नाही. त्यातच सेवासंस्थांच्या गटसचिवांचे सुरु असलेले असहकार आंदोलन शेतकर्यांना घातक ठरत असतांना या आंदोलनाबाबत शासनस्तरावर निर्णय होत नसल्याने आंदोलन बेमुदत सुरु आहे.
शेतकर्यांमध्ये कमालीचा गोंधळ
दुसरीकडे खरिपाच्या पिकविम्यासाठी शासनाने नुकतीच मुदतवाढ दिलेली असतांना बँका मुदतवाढीच्या काळात शेतकर्यांचा पीकविमा स्वीकारण्यासाठी चालढकल करत असल्याने शेतकरी कमालीचे वैतागले आहे. शासनाच्या ऑनलाईन गोंधळामुळे शेतकर्यांमध्ये मोठा गोंधळ उडाला असल्याने तालुक्यातील शेतकरी या गोंधळात अडकल्याने आठवडा वाया गेला. यामुळे शेतकर्यांचे शेतातील लक्ष विचलित झाल्याने मोठे नुकसान होवून ऑनलाईनसाठी काढण्यात आलेले कागदपत्रे यामध्ये झालेला खर्च शेतकर्यांच्या मुळाशी आला आहे. यासर्व प्रकारामुळे सोयगाव तालुक्यातील शेतकर्यांनी आपली शेती बरी हा निर्णय घेवून शासनाच्या निर्णयाचा नाद सोडण्याची शपथच घेवून टाकली आहे.