कर्जमाफी आता फॅशन झाली आहे

0

मुंबई: सत्ताधारी भाजप सरकारमधील नेत्यांची वादग्रस्त वक्तव्ये थांबण्याची चिन्हे दिसत नाहीयेत. महाराष्ट्रात कर्जमाफी आता फॅशन झाली आहे, असे वादग्रस्त विधान केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी मुंबईत केले आहे. ‘परिस्थिती अतिशय बिकट असेल, तरच कर्जमाफी द्यायला हवी. शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कर्जमाफी हा काही अंतिम उपाय नाही. कर्जमाफी म्हणजे आजकाल फॅशन झाली आहे,’असे व्यंकय्या नायडू यांनी म्हटले आहे. सध्या महाराष्ट्रभर शेतकरी कर्जमाफी आणि शेतकऱ्यांच्या समस्यावरून रान पेटले असताना नायडू यांनी हे विधान केल्याने संताप व्यक्त केला जात आहे. राज्यासह देशभरात सध्या शेतकऱ्यांकडून कर्जमाफीची मागणी करण्यात येते आहे. कर्जमाफी आणि शेतमालाला हमीभाव या शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईत बोलताना ‘कर्जमाफी आता फॅशन झाली आहे,’ असे धक्कादायक विधान व्यंकय्या नायडू यांनी केले आहे.