कर्जमाफी पात्र शेतकर्‍यांचा आकडा फुगला!

0

मुंबई (निलेश झालटे)। कर्जमाफीस पात्र शेतकरी आणि ऑनलाईन अर्ज भरलेल्या शेतकर्‍यांच्या 18 सप्टेंबरपर्यंतच्या आकडेवारीवरून पुन्हा एकदा गोंधळाचे चित्र निर्माण झाले आहे. कर्जमाफीस पात्र असलेल्या शेतकर्‍यांच्या आकड्यांपेक्षा ऑनलाइन अर्ज केलेल्या शेतकर्‍यांची संख्या 10 लाखांनी जास्त असल्याचे सरकारी आकडेवारीवरूनच समोर आले आहे. एकाच परिवारातील पती, पत्नी, मुलगा अशा सदस्यांनी अर्ज केले असावेत असा अंदाज सरकारी सूत्रांकडून मांडला जातो आहे.

मुंबईतल्या शेतकर्‍यांचा आकडा वाढला!
कर्जमाफी जाहीर झाल्यानंतर शासनाकडून जाहीर केलेल्या लाभार्थ्यांच्या यादीत मुंबईतील 900 च्या आसपास शेतकरी आल्याने प्रचंड गोंधळ झाला होता. त्यावेळी मुंबईत शेतकरी आले कसे? यावरून प्रचंड गदारोळ झाला होता. मात्र आता हाती आलेल्या सरकारी आकडेवारीनुसार मुंबईत शहरात 1,388 शेतकरी कर्जास पात्र असून तब्बल 21,555 शेतकर्‍यांनी मुंबई शहरातून ऑनलाईन अर्ज केले असल्याचे समोर आले आहे. मुंबई उपनगरातून 1,441 तर ठाण्यातून 66,403 अर्ज आले आहेत. दरम्यान रोजगारासाठी खेड्यातून मुंबईत स्थायिक झालेल्या शेतकर्‍यांनी हे अर्ज भरले असावेत असे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी सांगितले. पडताळणी करूनच कर्जमाफी दिली जाईल असेही ते म्हणाले. ऑनलाइन अर्ज भरण्यात अहमदनगर जिल्हा आघाडीवर असून जिल्ह्यात 3 लाख 13 हजार 903 अर्ज आले आहेत. जळगाव जिल्ह्यात 2,69,163 अर्ज भरले असून जिल्ह्यात पात्र लाभार्थी 2,40,740 आहेत.

धुळे आणि नंदुरबारमध्ये मात्र पात्र लाभार्थ्यांपेक्षा कमी ऑनलाईन अर्ज भरले आहेत. धुळ्यात 1 लाख 3 हजार 993 कर्जमाफीस पात्र शेतकरी असून केवळ 87, 705 शेतकर्‍यांनीच अर्ज भरले आहेत तर नंदुरबारमध्ये 47, 047 पात्र असताना 46, 272 शेतकर्‍यांनी अर्ज केले आहेत. पुण्यात 2, 59,177 पात्र असून 2,69,827 अर्ज आले आहेत. 18 सप्टेंबरपर्यंत 44 लाख 48 हजार 599 शेतकरी कर्जमाफीस पात्र असताना ऑनलाइन अर्ज मात्र 53 लाख, 39 हजार 9 आले असल्याने गोंधळ उडाला आहे. दरम्यान 22 सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन अर्जाची मुदत असून हा आकडा
वाढण्याची शक्यता आहे.

एका घरातून अधिक लोकांनी अर्ज भरले असल्याने हा आकडा वाढला असण्याची शक्यता आहे. 22 सप्टेंबरनंतर बँकांकडून आलेली माहीती आणि ऑनलाइन अर्ज यांची पडताळणी करूनच कर्जमाफीची प्रक्रिया केली जाईल.
– सुभाष देशमुख, सहकार व पणन मंत्री

बँकांकडून येणारी माहिती आणि अर्जांची पडताळणी करूनच कर्जमाफीची प्रक्रिया होणार आहे. मुंबईमध्ये बाहेरून आलेले श्रमिक वर्गांनी अर्ज भरले असण्याची शक्यता आहे.
– पांडुरंग फुंडकर,कृषिमंत्र