मुंबई : महाविकास आघाडीच्या सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे जाहीर केले आहे. कर्जमाफीची नुसती घोषणा झाली आहे प्रत्यक्ष मदत मिळणे अजून बाकी आहे. मात्र कर्जमाफीवरून श्रेय घेणे सुरु झाले आहे. शिवसेनेकडून कर्जमाफीचे श्रेय घेतले जात आहे. अनेक ठिकाणी शिवसेनेकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन करणारे पोस्टर झळकू लागले आहे. दरम्यान यावरून माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कर्जमाफीही महाविकास आघाडीच्या सरकारने केली असल्याने कोण्या एका पक्षाने याचे श्रेय घेऊ नये असे सांगत शिवसेनेला टोला लगावला.
राज्यसरकारच्या मंत्रिमंडळाचे सोमवारी 30 डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याच्या माहितीवर देखील अजित पवार यांनी शिक्कामोर्तब केले आहे. राष्ट्रवादीला गृहमंत्री पद दिल्यास मातोश्रीवर कॅमेरे लागतील असे विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले होते. यावरून अजित पवारांनी चंद्रकांत पाटीलांवर पलटवार केला. भाजपच्या हातात आलेली सत्ता गेल्यामुळे चंद्रकांत पाटील दुःखी असून त्याचे दु:ख मी समजू शकतो. जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. कावळ्यांच्या शापाने गाया मरत नाही, असा टोला अजित पवारांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना लगावला.